कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) च्या सीबीचीनं (CBT) २०२३-२४ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यासाठी व्याजदर जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफओनं कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आता कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा ०.१० टक्के अधिक व्याज मिळणार आहे. याचा अर्थ आता तुमच्या पीएफ खात्यावर ८.२५ टक्के व्याजदर दिला जाईल.
गेल्या वर्षी २८ मार्च रोजी ईपीएफओनं २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांसाठी ८.१५ टक्के व्याजदर जाहीर केला होता. तर ईपीएफओनं आर्थिक वर्ष २०२२ साठी ८.१० टक्के व्याज दिलं होतं. विशेष म्हणजे ईपीएफओ खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यावर दरवर्षी व्याजदर जाहीर करते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत ६ कोटींहून अधिक कर्मचारी संबंधित आहेत. ईपीएफओनं व्याजदर निश्चित केल्यानंतर, अर्थ मंत्रालय अंतिम निर्णय घेतं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावरील व्याज वर्षातून एकदा ३१ मार्च रोजी दिलं जातं.