कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीनं (CBT) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात वाढ केली आहे. EPFO नं कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८.१५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सीबीटीची बैठक काल म्हणजेच सोमवारपासून सुरू झाली.
दरम्यान, ईपीएफओकडून व्याजदर वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात येत होती. ईपीएफओनं व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेतलाय. मार्च २०२२ मध्ये, सरकारनं २०२१-२२ साठी ८.१ टक्के ईपीएफ दर जाहीर केला होता. तो १९७७-७८ पासून ४० वर्षांतील सर्वात कमी होता.
EPFO सबस्क्रायबर्ससाठी मोठी अपडेट, पाहा काय आहे निर्णय
बैठक संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा होती. दरवर्षी मार्च महिन्यात सीबीटीच्या बैठकीत व्याजदरांचा निर्णय घेतला जातो. ईपीएफओनं गेल्या वर्षी चांगली कमाई केली होती. त्यामुळेच यावेळी व्याजदरात वाढ अपेक्षित होती.
ईपीएफओचं उत्पन्न वाढलं
कमाईच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसाठी मागील वर्ष खूप चांगलं ठरलं होतं. ईपीएफओच्या उत्पन्नात वाढ झाली. EPFO तुमचा निधी अनेक ठिकाणी गुंतवत असते. जिथून त्यांना परतावा मिळतो. या कमाईद्वारे, EPFO तुम्हाला गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज देतं. यावेळी व्याजदर वाढवण्यामागे अनेक कारणं दिली जात होती. यावेळी ८.२० टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आली होती. त्याचबरोबर व्याजदर स्थिर राहण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.