EPFO News : काही प्रकरणांमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (ईपीएफओ) दाव्यांचा निपटारा करण्याचे नियम शिथिल केले आहेत. ईपीएफओच्या परिपत्रकानुसार, ईपीएफओ सदस्यांना सर्टिफाईड बँक पासबुक किंवा चेक लीफचे फोटो देण्याची आवश्यकता नाही. सध्या ईपीएफमधून क्लेम करण्यासाठी चेकबुकचा फोटो देणं आवश्यक आहे. पण आता त्याची गरज भासणार नाही. दाव्याची पडताळणी करण्यासाठी इतर पद्धतींचा वापर केला जाईल.
ऑनलाइन बँक KYC व्हेरिफिकेशन : KYC ची माहिती थेट आपल्या बँक किंवा नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडून तपासली जाईल.
डीएससीद्वारे नियोक्ता पडताळणी: आपला नियोक्ता आपल्या बँक खात्याच्या माहितीची पडताळणी करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) वापरू शकतो.
सीडेड आधार क्रमांकाची पडताळणी: यूआयडीएआय आपल्या बँकेच्या आधार क्रमांकाची पडताळणी करेल. यामुळे बँक पासबुक किंवा चेक लीफच्या फोटोशिवाय ऑनलाइन क्लेम व्हेरिफिकेशन सादर केलं जाणार असल्यानं ऑनलाइन क्लेम सेटलमेंटच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि फेटाळलेल्या दाव्यांची संख्या कमी होईल.
पात्रतेचे नियमही निश्चित केले
बँक डेटा व्हेलिडेशन : जर तुमची बँकेची माहिती केवायसी किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे आधी पडताळली गेली असेल तर तुम्हाला कोणतीही कागदपत्रं सादर करण्याची आवश्यकता नाही.
क्लेम अमाऊंट : ही सूट ठराविक मर्यादेपेक्षा कमी असलेल्या दाव्यांना लागू होऊ शकते.
ऑनलाइन क्लेम कसा कराल?
- आपल्या UAN चा वापर करून मेंबर इंटरफेसमध्ये लॉग इन करा.
- युएएनसाठी लिस्ट केवायसी आणि एलिजिबिलिटी योग्य आणि पूर्ण आहे का हे तपासा.
- योग्य क्लेम निवडा.
- ऑनलाइन क्लेम दाखल करण्यासाठी युआयडीएआयसोबत रजिस्टर मोबाइल नंबरवर मिळालेल्या ओटीपीनं व्हेरिफिकेशन करा.