Join us

FD Rate Hike: सर्वांच्या बाप निघाल्या! थोडेथोडके नाही एफडीवर ८.८० टक्क्यांपर्यंत व्याज देणार या बँका, कसला विचार करताय...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 7:50 PM

Bank FD Rate: तुम्हाला तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवून त्यातून चांगली कमाई करायची असेल तर एका बँकेने चांगली संधी आणली आहे.

आज आपला पैसा कुठे गुंतवावा, कुठे जास्त फायदा होईल, कुठे तुमचे पैसे सुरक्षित राहतील... सगळाच भुलभुलैय्या आहे. आजकाल तर एलआयसीत देखील तुमचा पैसा सुरक्षित राहिला नाहीय, असे त्या अदानी प्रकरणावरून बोलले जात आहे. घरात ठेवला तरी चोरीची भीती आणि बँकेत ठेवला तरी हॅकरकडून ते उडविण्याची भीती... 

तुम्हाला तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवून त्यातून चांगली कमाई करायची असेल तर एका बँकेने चांगली संधी आणली आहे. बंधन बँकेचे नाव तुम्ही ऐकले असेल, या बँकेने त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बंधन बँकेने एफडीवरील व्याजदर 0.50 टक्क्यांनी वाढविले आहेत. हे वाढलेले व्याजदर आजपासूनच लागू करण्यात आले आहेत. 

बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्के आणि सामान्य ग्राहकांना ८ टक्के व्याजदर देत आहे. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात लक्षणीय वाढ केली होती. याचा परिणाम असा झाला की बँकांनी मुदत ठेवींचे दरही वाढवले. यासोबतच बँकांनी गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारखी कर्जेही महाग केली आहेत. 

बंधन बँकेने काही मुदत ठेवींच्या व्याजदरातही वाढ केली आहे. बँक आता 600 दिवसांच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्के आणि इतर नागरिकांना 8 टक्के वार्षिक दराने व्याज देणार आहे. त्याचप्रमाणे एक वर्ष कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ७ टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ०.५ टक्के अतिरिक्त व्याज दिले जाणार आहे. 

बंधन बँकेपूर्वी जनता स्मॉल फायनान्स बँकेनेही त्यांच्या एफडीवरील व्याजदर वाढवण्याची घोषणा केली होती. FD वर 8.10% पर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ८.८० टक्के व्याज दिले जाणार आहे. 

टॅग्स :बँक