Join us

FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 2:18 PM

FD Vs NSC Post Office Schemes: जर तुम्ही अशा योजनेच्या शोधात असाल ज्यात तुम्हाला चांगलं व्याज मिळेल आणि तुमचा टॅक्सही वाचेल तर पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये तुम्हाला हा दुहेरी लाभ मिळू शकतो.

FD Vs NSC Post Office Schemes: जर तुम्ही अशा योजनेच्या शोधात असाल ज्यात तुम्हाला चांगलं व्याज मिळेल आणि तुमचा टॅक्सही वाचेल तर पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये तुम्हाला हा दुहेरी लाभ मिळू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये बँकेसारख्या अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात, ज्यात उत्तम नफा मिळतो. चांगले व्याजदर आणि टॅक्स बेनिफिट्ससाठी तुम्ही पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये (Post Office FD) गुंतवणूक करू शकता. ही स्कीम पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट म्हणून ओळखली जाते. 5 वर्षांच्या एफडीला टॅक्स फ्री एफडी म्हणतात. 

पोस्ट ऑफिसच्या एफडीव्यतिरिक्त तुमच्याकडे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्येही गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे. तुम्ही भरपूर व्याज आणि कर सवलतीचाही लाभ घेऊ शकता. पोस्ट ऑफिसएफडीवर सध्या 7.5 टक्के व्याज मिळत आहे. तर एनएससीमध्ये 7.7 टक्के दरानं व्याज मिळतं. जर तुम्ही 2,00,000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर 5 वर्षांच्या एफडीवर किती पैसे मिळतील आणि 5 वर्षांच्या एनएससीवर किती परतावा मिळेल हे पाहूया. 

पोस्ट ऑफिस एफडी, एनएससीवर किती परतावा 

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये 2,00,000 रुपये गुंतवले तर सध्या उपलब्ध असलेल्या 7.5% व्याजानुसार हिशोब केल्यास त्यावर तुम्हाला 89,990 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे तुमची मॅच्युरिटी रक्कम 2,89,990 रुपये होईल. जर तुम्ही पोस्ट ऑफिस एनएससीमध्ये 2,00,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला 7.7 टक्के दराने 5 वर्षात 89,807 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 2,89,807 रुपये मिळतील. 

एनएससीवर कमी रिटर्न का? 

जर हिशोब पाहिला तर दोघांच्या परताव्यात थोडाफार फरक दिसेल. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, एनएससीवर जास्त व्याजदर असूनही कमी परतावा मिळतो, तर एफडीला कमी व्याजदरानंतरही अधिक परतावा मिळत आहे. याचं कारण म्हणजे पोस्ट ऑफिसएफडीमधील व्याजाची गणना तिमाही आधारावर आणि एनएससीमध्ये व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते.

टॅग्स :गुंतवणूक