Join us  

३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा ही महत्त्वाची कामं; अन्यथा होईल नुकसान, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 11:02 AM

आता सप्टेंबर महिना संपायला फक्त दोन आठवडे उरले आहेत. या महिन्यासोबतच आर्थिक वर्षाचे सहा महिनेही पूर्ण होतील.

Financial Deadline: आता सप्टेंबर महिना संपायला फक्त दोन आठवडे उरले आहेत. या महिन्यासोबतच आर्थिक वर्षाचे सहा महिनेही पूर्ण होतील. यामुळेच अनेक आर्थिक कामांची आणि बदलांची अंतिम मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. ही कामं वेळेत पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास, तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पाहूया कोणती कामं तुम्हाला ३० सप्टेंबरच्या आधी पूर्ण करावी लागणार आहेत.

छोट्या योजनांसाठी आधारपीपीएफ (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) यांसारख्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. त्यांना २० सप्टेंबर २०२३ पर्यंत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन आधार जमा करावं लागेल. त्यांनी तसं न केल्यास त्यांची गुंतवणूक गोठवली जाईल. आधार दिल्यानंतरच गुंतवणुकीची अनफ्रीज होईल. अर्थ मंत्रालयानं पीपीएफ, एनएससी आणि अन्य बचत योजनांसाठी आधार आणि पॅन अनिवार्य केलं.सध्याच्या गुंतवणूकदारांसाठी आधार अनिवार्य करण्यात आलंय. मंत्रालयानं ३१ मार्च २०२३ रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. यानुसार, जर कोणी खातं चालवत असेल आणि त्यानं अकाऊंट ऑफिसमध्ये आधार क्रमांक सादर केला नसेल तर त्याला सहा महिन्यांच्या आत हे करावं लागेल. सहा महिन्यांचा कालावधी ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपेल.

एसबीआय व्हिकेअरएसबीआयनं ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या व्हिकेअर (WeCare) स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट योजनेची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. या योजनेत केवळ ज्येष्ठ नागरिकच सहभागी होऊ शकतात. यामध्ये त्यांना एफडीवर ७.५ टक्के व्याज दिलं जात आहे, जे सामान्य नागरिकांपेक्षा १०० बेसिस पॉइंट्स अधिक आहे. हा लाभ नवीन डिपॉझिट्सवर आणि डिपॉझिट्सच्या रिन्युअलवर दिला जात आहे.

आयडीबीआय अमृत महोत्सव एफडीआयडीबीआय बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदतही ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. अमृत ​​महोत्सव एफडी योजनेअंतर्गत, बँक ३७५ दिवसांच्या कालावधीवर ७.१० टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज दिलं जात आहे. तसंच, या योजनेंतर्गत ४४४ दिवसांच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांना ७.१५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के व्याज दिलं जातंय.

डीमॅट, एमएफ नॉमिनीबाजार नियामक सेबीनं डिमॅट खातेधारकांसाठी नामांकन करण्यासाठी किंवा नामांकन रद्द करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर निश्चित केली आहे. त्यांनी तसं न केल्यास त्यांचा म्युच्युअल फंड फोलिओ डेबिटसाठी गोठवला जाईल. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नॉमिनी डिटेल्स सबमिट करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. सेबीनं या संदर्भात २८ मार्च २०२३ रोजी एक परिपत्रक जारी केलं होतं.

२ हजारांची नोटआरबीआयनं १९ मे रोजी २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहकांना ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची किंवा त्या बदलून घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. तुमच्याजवळ २००० रुपयांची नोट पडून असल्यास तुम्ही ती बँकेत जमा करू शकता किंवा ३० सप्टेंबरपर्यंत बदलू शकता. आरबीआयच्या म्हणण्यानुसार २००० रुपयांच्या बहुतांश नोटा परत आल्या आहेत.

टॅग्स :व्यवसायएसबीआयपीपीएफगुंतवणूक