Financial Planning : तुमचे उत्पन्न लाखभर असो की काही हजार, महिन्याचं आर्थिक नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. बजेट हा आर्थिक नियोजनाचा गाभा आहे. कोणतेही आर्थिक ध्येय गाठण्यासाठी तुम्ही केलेल्या नियोजनाशी चिकटून राहणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन म्हणजे खर्चाचा हिशोब असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, बजेट म्हणजे धनसंचय करण्याची गुरुकिल्ली आहे. तुमच्या गरजा, भविष्यातील तरतूद आणि आर्थिक स्वातंत्र्य उपभोगायचं असेल तर आत्तापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी तुमच्यामध्ये आर्थिक शिस्त यायला हवी. यासाठी तुम्ही ५०-३०-२० चा फॉर्म्युला वापरू शकता.
काय आहे ५०-३०-२० चा नियम?
५०-३०-२० चा नियम तुम्हाला आर्थिक नियोजन करण्यासाठी रोडमॅप देतो. एसबीआय सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, तुमच्या गरजांवर होणारा खर्च, खर्चानंतर बचत आणि बचितीतून गुंतवणूक करण्यासाठी हा नियम उपयोगी येतो.
नियम समजून घ्या
नियमानुसार तुमच्या निव्वळ उत्पन्नापैकी अर्धा किंवा 50% (करानंतर) तुमच्या गरजांसाठी बाजूला ठेवावा. यामध्ये अन्न, कपडे, भाडे, आरोग्यसेवा, विमा प्रीमियम, मुलांचे शिक्षण, आर्थिक जबाबदाऱ्या इत्यादी खर्चाचा समावेश होतो. एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, या मूलभूत गरजा आहेत आणि तुम्ही या विभागात फारशी तडजोड किंवा एडजस्टमेंट करू शकत नाही.
निवृत्तीचं टेंशन होईल दूर
नियमाचा दुसरा भाग म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या उत्पन्नाच्या 30% वाटा ठेवणे. उदाहरणार्थ, यामध्ये महत्त्वाकांक्षी लाईफस्टाईल, मोठे घर, हौसमजा, सुट्ट्या, मनोरंजन इत्यादींचा समावेश असू शकतो. या संपूर्ण ३० टक्क्यातील निधी खर्च झाला नाही. तर तो भाग बचतीसाठी वापरू शकता. नियमातील शेवटचा पण महत्त्वाचा हिस्सा. यामध्ये तुम्ही तुमची बचत सुधारण्यासाठी बदल करू शकता. शेवटचा २०% हिस्सा तुमच्या बचतीमध्ये जातो. यामध्ये आणीबाणीसाठी बचत, गृहकर्ज मार्जिन, कार लोन, दीर्घकालीन उद्दिष्टे जसे की सेवानिवृत्ती, मुलाचे शिक्षण इत्यादींचा समावेश होतो. यात कर आणि पीएफ कपातीनंतरचे निव्वळ उत्पन्न २०% मानले गेले आहे. याचा अर्थ तुमची प्रभावी बचत तुमच्या निव्वळ उत्पन्नाच्या २०% पेक्षा जास्त असेल आणि तुमच्या आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाची आहे.