Join us  

वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनासाठी पाच महत्त्वाच्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 8:25 PM

आपले वैयक्तिक स्वरूपातील आर्थिक व्यवहार कसे सांभाळावेत, याचे पुरेसे ज्ञान नसले तर अधिक उत्पन्न असणारी व्यक्तीही कर्जाच्या ओझ्याखाली अडकू शकते.

पुष्किना नौटियाल

आर्थिक स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवे असते आणि ते फार महत्त्वाचेही असते. मात्र, आपले वैयक्तिक स्वरूपातील आर्थिक व्यवहार कसे सांभाळावेत, याचे पुरेसे ज्ञान नसले तर अधिक उत्पन्न असणारी व्यक्तीही कर्जाच्या ओझ्याखाली अडकू शकते. वित्त व्यवस्थापन म्हणजेच फायनान्शिअल मॅनेजमेंटमुळे तुम्ही तुमचा पैसा कुठे आणि कसा खर्च करताय याबद्दल अधिक स्पष्ट दृष्टिकोन मिळतो. शिवाय, तुमची आर्थिक लक्ष्ये गाठण्यातही ही सवय उपयोगी ठरते. म्हणूनच, तुम्हाला पैशाच्या बाबतीत अधिक चांगले परिणाम मिळवण्यात साह्यकारी ठरतील अशा पाच टिप्स आम्ही इथे देत आहोत.

१.    बजेट आखण्याचे महत्त्वबजेट ठरवणे म्हणजे तुमचा पैसा कसा खर्च करायचा याची प्रक्रिया आणि स्वरूप यांची मांडणी. थोडक्यात, तुमच्या सर्व खर्चांची यादी करणे आणि त्यासाठी ठराविक रक्कम बाजूला काढणे, तुमच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालणे. असा आराखडा किंवा यादी तयार असली की तुमच्या सर्व खर्चांसाठी पुरेशी रक्कम आहे की नाही आणि कुठे कमतरता भासू शकते, याचा अंदाज आधीच घेता येतो. या वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टीमुळे तुम्हाला खर्चांचा प्राधान्यक्रम मांडता येतो. बजेट किंवा खर्चांच्या यादीप्रमाणेच खर्च केले तर कर्ज घेण्याचीही गरज पडत नाही किंवा तुमच्यावर आधीपासून कर्ज असेल तर त्यातून बाहेर कसे पडावे याचे मार्गही यामुळे सापडतात.

२.    खर्चाच्या आधी बचत करानव्याने कमावू लागलेल्या आणि बऱ्यापैकी पैसे मिळवणाऱ्या तरुणांना वाटते की आता आपण आयुष्यभरासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहोत. यामुळे होते असे की, यातील बहुतांश तरूण दीर्घकाळासाठीच नाही तर नजीकच्या भविष्यकाळातील आर्थिक लाभांसाठीही गुंतवणूक करण्याकडे दुर्लक्ष करतात. बचतीमुळे तुम्हाला दैनंदिन खर्चांमध्ये मदत होते. पण, दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास या पैशाचा अधिक चांगला वापर करता येईल आणि त्यातून अधिक लाभ मिळवता येतील. आर्थिक व्यवस्थापनातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयुष्यातील तुमच्या प्राधान्यक्रमानुसार गुंतवणूक करणे. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत का? लग्नासाठी खर्चाची तरतूद करायची आहे का? तुम्ही तरूण पालक आहात का? तुमच्या गरजांनुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकता. म्युच्युअल फंड्स, फिक्स्ड डिपॉझिट (ठेवी), रिअल इस्टेट, सरकारी बाँड्स किंवा कॉर्पोरेट बाँड्स, स्टॉक्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांमध्ये, गुंतवणूक काळाच्या शेवटी गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळतोच. शिवाय, आयुष्यात कधी काही तातडीची निकड भासली तर त्यासाठीही तुमच्याकडे जमा पुंजी राहते.

३.    कम्पाऊंड किंवा चक्रवाढ व्याजाची ताकदआइनस्टाइनचं प्रसिद्ध वाक्य आहे – ‘चक्रवाढ व्याज हे जगातील आठवं आश्चर्य आहे. ज्याला हे कळलं तो त्यातून कमावतो आणि ज्याला नाही तो व्याज भरतो.’ चक्रवाढ पद्धतीत कमावलेला नफा मूळ मुद्दल रकमेत जोडला जातो आणि ही संपूर्ण रक्कम पुन्हा गुंतवली जाते. त्यामुळे नफ्याचे प्रमाण आपोआपच वाढते. कम्पाऊंडिंग हे मुळात दीर्घकालीन गुंतवणूक धोरण आहे. तुम्ही जितकी लवकर सुरुवात कराल तितका अधिक लाभ! शिवाय, तुमची रक्कम जितका अधिक काळ गुंतवलेली राहील त्या प्रमाणात रकमेत भर पडत राहील. कम्पाऊंडिंग रिटर्न्स म्हणजे चक्रवाढ परतावा मिळवण्यासंदर्भात गुंतवणुकीचा कालावधी हा कळीचा मुद्दा आहे. तुम्ही कितीही रक्कम गुंतवा, पण त्यात सातत्य आणि नियमितता हवी. अगदी छोटी रक्कमही दरमहा वाढत राहते.

४.    कर्जासाठी सुरक्षित पर्याय निवडा काहीवेळा काही खर्च अचानक उद्भवतात, कधी एखादी आपातकालीन स्थिती निर्माण होते. अशा प्रत्येक स्थितीत आपण आर्थिक गरजा भागवू शकतोच, असे नाही. पगाराचे दिवस आणि खर्च या चक्रात अडकल्यावर काहीवेळा आपल्याला ‘पे डे लोन्स’ घेण्याची गरज भासू शकते. पण, अशी कर्जं फारच महाग पडू शकतात. अशी पे डे कर्ज देणारे खूप जास्त व्याज आणि शुल्क आकारतात. शिवाय, त्यांच्याकडील दंड/लेट फी शुल्कही फारच जास्त असते. क्रेडिट कार्ड आणि बाय नाऊ पे लेटर सारख्या सुविधाही आहेत. हे पर्याय काहीसे सोयीस्कर असले तरी त्यावरही व्याज भरावे लागेतच आणि त्यातील लेट फी अधिक असू शकते. त्याऐवजी सॅलरी-ऑन-डिमांड सारखे पर्याय वापरून पहा. यात कोणतेही कर्ज किंवा अधिक शुल्क न आकारता तुमचा पुढचा पगार मिळवता येतो.

५.    तज्ज्ञांचा सल्ला घ्याआपण तरूण आहोत तर आर्थिक नियोजनाची काय गरज किंवा आपण श्रीमंत आहोत मग आर्थिक व्यवहारांची मांडणी करण्याची काय गरज, असा विचार करू नका. आर्थिक सल्लागारांशी चर्चा करा आणि त्यांच्या मदतीने तुमच्या गरजांनुसार योग्य निर्णय घ्या. बँकिंग, बजेटिंग, कर्ज आणि क्रेडिट सांभाळणे, गुंतवणूक या बाबी समजून घेण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी वयाचे बंधन नाही, तुम्ही कोणत्याही वयात ही सुरुवात करू शकता.

तुम्ही सध्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असाल, वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनासाठी ठोस आराखडा असणे फार महत्त्वाचे आहे आणि ते गरजेचेही आहे. कारण, त्यामुळे तुम्ही अधिक चांगले आयुष्य जगू शकाल… आताही आणि भविष्यातही!

लेखिका “रिफाइन” या अर्थविषयक सल्लागार कंपनीच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर आहेत.

टॅग्स :गुंतवणूक