Join us

वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?

By जयदीप दाभोळकर | Published: September 30, 2024 3:57 PM

Premium Smartphones : स्टेटस सिम्बॉलसाठी अनेक लोक ईएमआयवर महागडे फोन विकत घेताहेत. पण या स्मार्टफोन्सची किंमतही झपाट्यानं कमी होतेय. ई कॉमर्स कंपन्यांच्या सेलदरम्यान हे स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीतही मिळतात.

Premium Smartphones : स्मार्टफोन्स किंवा मोबाइल फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. त्याच्या मदतीनं आपली अनेक कामं सोपीही झालीयेत. पण गेल्या काही महिन्यांमध्ये लक्झरी स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. काऊंटरपॉईंटच्या रिसर्चनुसार एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमत असलेल्या स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये वर्ष-दर-वर्ष आधारावर पहिल्या तिमाहित २० टक्के आणि दुसऱ्या तिमाहीत १० टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं.

सध्या प्रीमिअम फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची क्रेझ वाढतेय. त्यातच कंपन्या लाँचच्या वेळी आपले काही फीचर्स दाखवून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. तुलनेनं याची किंमत सामान्य स्मार्टफोन्स पेक्षा अधिक असते. म्हटलं तर २०-३० हजार रुपयांच्या स्मार्टफोनमध्येही आपली गरज भागू शकते. पण महागडे स्मार्टफोन्स हे अनेकांचं आता स्टेटस सिम्बॉल बनू लागलेत. हिंदीत एक म्हण आह, 'उधार लेकर घी खाना' तसंच काहीशी परिस्थिती सध्या दिसत आहे. स्टेटस सिम्बॉलसाठी अनेक लोक ईएमआयवर महागडे फोन विकत घेताहेत. पण या स्मार्टफोन्सची किंमतही झपाट्यानं कमी होतेय. ई कॉमर्स कंपन्यांच्या सेलदरम्यान हे स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीतही मिळतात. पाहूया अशीच काही उदाहरणं.

वर्षभरातच मोठं नुकसान

Google Pixel 8 या स्मार्टफोनबद्दल सांगायचं झालं तर भारतात गेल्या वर्षी हा स्मार्टफोन ७५,९९९ रुपयांना लॉन्च झाला होता. पण आता फ्लिपकार्टवर सेलमध्ये हा स्मार्टफोन ३८ हजारांना मिळत आहे. अनेक ब्रँड्सची हीच कहाणी आहे. गेल्यावर्षी ८० हजारांना लाँच झालेला आयफोन १५ फ्लिपकार्टच्या सेलदरम्यान ५० ते ५५ हजारांच्या दरम्यान मिळतो. म्हणजेच वर्षभरात या फोनची किंमत ३० हजारांपर्यंत कमी झाली. इतकंच काय तर Samsung s23 हा गेल्यावर्षीचा फ्लॅगशिप स्मार्टफओन आता ३८ हजारांना मिळतोय. केवळ याच नाही तर अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची आज तिच स्थिती आहे.

एक्सचेंज व्हॅल्यूही होते कमी

बहुतांश वेळा असं होतं की एखाद्या स्मार्टफोनचं नवं व्हेरिअंट येतं आणि त्याच्या जुन्या व्हेरिअंटची किंमत कमी होते. म्हणजेत ७० हजारांच्या स्मार्टफोनचे एक्सचेंज करताना तुम्हाला २५-३० हजार मिळतात. पण जर तुम्ही मिडरेंज स्मार्टफोन्स पाहिले तर यावर तुम्हाला जास्त डिस्काऊंट मिळत नाही. कदाचित हजार दोन हजारांचा मिळतोय. पण त्याच्या किंमतीतही जास्त फरक पडलेला नाही. 

घाई करू नका 

जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याचं प्लॅनिंग करत असाल तर घाई करू नका. तुमचा मेहनतीचा पैसा फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये टाकायचा की तसाच मिडरेंज फोन घ्यायचा याचा विचार करा. मुळात स्टेटस सिम्बॉलपेक्षा तुमची गरज काय हे ओळखून मगच निर्णय घ्या. फोन खरेदी करताना कायम तुमच्या बजेटचा विचार करा.

टॅग्स :स्मार्टफोनअ‍ॅमेझॉनफ्लिपकार्ट