Join us  

नोकरीदरम्यान कोणत्या कामासाठी काढू शकता EPFO मधील पैसे, जाणून घ्या नियम आणि अटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 2:52 PM

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीअंतर्गत काही रक्कम कापली जाते. याद्वारे जमा होणाऱ्या रकमेवर सरकारकडून चांगलं व्याजही दिलं जातं.

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीअंतर्गत काही रक्कम कापली जाते. याद्वारे जमा होणाऱ्या रकमेवर सरकारकडून चांगलं व्याजही दिलं जातं. ईपीएफची संपूर्ण रक्कम फक्त दोनच परिस्थितींमध्ये काढता येते. पहिली म्हणजे, कर्मचाऱ्यानं जर नोकरी गमावली आणि तो दोन महिने बेरोजगार असेल तर आणि दुसरे म्हणजे निवृत्तीनंतर. पण तुमची इच्छा असल्यास, तुम्ही नोकरीच्या मध्येही पीएफ मधून आंशिक रित्या पैसे काढू शकता. यासाठी काय अटी आणि शर्ती आहेत ते जाणून घेऊ.

विवाह आणि शिक्षणासाठीजर तुमची बहीण, मुलगी, मुलगा किंवा कुटुंबातील कोणत्याही खास सदस्याचं लग्न असेल किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी EPF मधून अंशतः पैसे काढायचे असतील तर दोन्ही बाबतीत तुमची सेवा 7 वर्षे असणे आवश्यक आहे. 7 वर्षांच्या सेवेनंतर, तुम्ही तुमच्या योगदानाच्या 50 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता. 

घर किंवा जमिनीसाठीजर कर्मचारी 5 वर्षे सतत सेवेत असेल तर तो घराच्या बांधकामासाठी किंवा खरेदी तसंच दुरुस्तीसाठी रक्कम काढू शकतो. पण एका नियमानुसार ही रक्कम एका ठराविक मर्यादेपर्यंतच काढता येते. तुम्ही घरासाठी जमीन खरेदी करण्यासाठी तुमच्या मासिक पगाराच्या 24 पट आणि घर खरेदी किंवा बांधकामासाठी तुमच्या मासिक पगाराच्या 36 पटीपर्यंत रक्कम काढू शकता.

वैद्यकीय उपचारांसाठीगंभीर आजारावर उपचार, कामाच्या ठिकाणी अपघातामुळे कायमचं अपंगत्व येणं, कंपनी बंद होणं इत्यादी आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही अटी नाहीत. तुम्ही EPF खात्यातून कधीही पैसे काढू शकता.

जर कंपनी 15 दिवसांपेक्षा जास्त काळ बंद असेल, तर कर्मचारी कधीही ईपीएफ म्हणून जमा केलेली संपूर्ण रक्कम काढू शकतो. जर तुमची नोकरी गेली असेल किंवा तुम्ही सोडली असेल आणि तुम्हाला एक महिन्यानंतरच निधी काढायचा असेल; तर तुम्ही 75 टक्के रक्कम काढू शकता. नवीन रोजगार मिळाल्यावर उर्वरित रक्कम तुमच्या नवीन EPF खात्यात हस्तांतरित केली जाईल. पण सलग दोन महिने बेरोजगार असल्यास तुम्ही पीएफची पूर्ण रक्कम काढू शकता.

फॉर्म 31 आणि 19 कधी आवश्यक आहे?जेव्हा तुम्ही नोकरीदरम्यान पैशांशी संबंधित गरज पूर्ण करण्यासाठी तुमच्या पीएफ बॅलन्स किंवा अॅडव्हान्स पीएफचा काही भाग काढता तेव्हा तुम्हाला पीएफ विथड्रॉल फॉर्म 31 आवश्यक असतो. त्याला EPF क्लेम फॉर्म 31 असेही म्हणतात.

तर दुसरीकडे तुम्हाला ईपीएफचा संपूर्ण निधी काढावा लागतो तेव्हा तुम्ही पीएफ विथड्रॉल फॉर्म 19 चा वापर करावा लागतो. त्याला ईपीएफ क्लेम फॉर्म 19 असंही म्हणतात.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीगुंतवणूकसरकार