Foreign Investment in India: मागील काही वर्षांमध्ये परदेशी कंपन्यांचा भारतावरील विश्वास वाढला आहे. तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत जगातील हब मानल्या जाणाऱ्या जपानची सर्वात मोठी कंपनी लवकरच भारतात येत आहे. चीनसाठी हा मोठा धक्का असेल, कारण त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे मोठ्या कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत आणि भारताला पर्याय म्हणून पाहत आहेत. आता जपानी कंपनीनेही भारतात आपली बाजारपेठ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्स्टनुसार, जपानमधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक TDK कॉर्पोरेशन भारतात येत आहे. ही कंपनी Apple Inc ची जागतिक लिथियम आयन (Li-ion) बॅटरी पुरवठादार आहे. TDK भारतात Apple च्या iPhone साठी बॅटरी सेल तयार करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी भारतात Apple च्या लिथियम आयन बॅटरीसाठी सेल असेंबलर सनवोडा इलेक्ट्रॉनिक्सला पुरवठा करेल. सनवोडा जगभरातील विविध बाजारपेठांमधून बॅटरी आयात करते आणि देशातील एकमेक लिथियम आयन बॅटरी सेल पुरवठादार आहे.
हरियाणामध्ये 180 एकर जमीन खरेदी
TDK भारतातील लिथियम आयन बॅटरी सेल तयार करण्यासाठी हरियाणातील मानेसर येथे एक प्लांट उभारणार आहे. त्यासाठी त्यांनी येथे 180 एकर जमीनही खरेदी केली आहे. Apple ला पुरवठा करण्यासाठी TDK लवकरच बॅटरी सेलचे उत्पादन सुरू करेल. याशिवाय देशात नोकरीच्या संधी वाढतील आणि आयटी व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होईल. TDK च्या ऍपल सेलच्या भारतात उत्पादनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
रोजगाराच्या संधी खुल्या होतील
आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही त्यांच्या X (ट्विटर) वर बिझनेस स्टँडर्डचा अहवाल शेअर केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'भारतात मोबाइल उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी PLI योजनेचा आणखी एक मोठा विजय. Apple साठी सेलचा सर्वात मोठा पुरवठादार TDK, मानेसर येथे 180 एकर जमिनीवर एक युनिट स्थापन करणार आहे, जिथे #MadeInIndia iPhone बॅटरी सेल तयार केले जातील. TDK भारतात आल्याने 8,000 ते 10,000 रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
चीनला धक्का
भारताची बाजारपेठ खूप मोठी आहे, त्यामुळे विविध कंपन्या येथे पैसे गुंतवत आहेत. यामुळे चीनला तोटा सहन करावा लागतोय. चीनच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि सरकारी हस्तक्षेपामुळे अनेक कंपन्यांनी चीनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून या कंपन्या भारताकडे एक मोठा पर्याय म्हणून पाहत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, 25 वर्षांत पहिल्यांदाच चीनची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) उणेमध्ये गेली आहे. त्यांची परकीय गुंतवणूक 11.8 अब्ज डॉलरने कमी झाली आहे.