Foreign Currency: गेल्या दोन महिन्यांत भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात सुमारे 48 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस हा $704.88 अब्जाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होता. पण, 22 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात हा $656.582 अब्जासह अनेक महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर आला आहे.
गेल्या एका आठवड्याबद्दल बोलायचे झाले, तर दोन महिन्यांच्या सततच्या घसरणीनंतर यात वाढ झाली आहे. 29 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा $1.51 अब्जने वाढून $658.09 अब्ज झाला आहे. पण, एकंदरीत पाहिल्यास भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात अजूनही मोठी घसरण दिसून येते. यामागचे कारण जाणून घेऊया.
भारताचा परकीय चलन साठा का कमी झाला?
गेल्या दोन महिन्यांत भारताच्या परकीय चलन साठ्यात घट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, रुपया दबावाखाली आहे, म्हणजेच डॉलरच्या तुलनेत कमजोर होत आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे डॉलर मजबूत झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सतत कमकुवत होत असल्याने रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक सातत्याने डॉलरची विक्री करत आहे.
तसेच, मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे परदेशी गुंतवणूकदार सातत्याने भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून चीनमध्ये गुंतवणूक करत आहेत. याला सामोरे जाण्यासाठी, रिझर्व्ह बँक दीर्घ काळापासून परकीय चलन बाजारातील धोरणात्मक हस्तक्षेपाचे धोरण अवलंबत आहे. रुपयाची तीव्र घसरण थांबवण्यासाठी डॉलर्स विकणे आणि ताकदीच्या वेळी डॉलर्स खरेदी करणे, यांसारख्या उपायांमुळेही परकीच चलन साठ्यात घट होत आहे.