Gold Price: नवीन वर्ष 2024 मध्येही सोन्याची चमक कायम राहणार आहे. पुढील वर्षी सोन्याचा भाव 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते, रुपयाची स्थिरता, भू-राजकीय अनिश्चितता आणि धीम्या जागतिक आर्थिक वाढीमुळे सोन्याचे आकर्षण नवीन वर्षातही कायम राहील. सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा दर 63,060 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ते प्रति औंस 2,058 डॉलर्सच्या आसपास आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला जागतिक तणावामुळे पश्चिम आशियामध्ये सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले.
2023 मध्ये सोन्याच्या किमतीत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. या वर्षी देशांतर्गत बाजारात सोन्याने पहिल्यांदा 4 मे रोजी 61,845 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,083 डॉलर्स प्रति औंस या नवीन उच्चांकावर पोहोचले. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी सोन्याने 61,914 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कॉमट्रेंड्झचे संशोधन संचालक ज्ञानशेखर त्यागराजन म्हणतात की सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण कायम आहे. त्यामुळेच यावर्षी 4 डिसेंबर रोजी सोन्याने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आणि दराने 64,063 रुपये प्रति 10 ग्रॅम असा नवा उच्चांक गाठला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,140 डॉलर्स प्रति औंस या उच्चांकावर पोहोचला.
सोनं 70 हजारांचा दर गाठणार?
ते म्हणाले की 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2,400 डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. देशांतर्गत बाजारात सोनं 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते. 2024 च्या निवडणूक वर्षात रुपया कमकुवत होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे. यामुळे देशांतर्गत पातळीवर सोन्याच्या किमती वाढतील. भारतात 2024 साली सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय नवीन वर्षात इतर अनेक देशांमध्येही निवडणुका होणार आहेत.
स्वस्त सोनं विसरून जा, येत्या वर्षात आणखी चमक वाढणार; ₹७० हजारांपर्यंत जाऊ शकतात दर
Gold Price: नवीन वर्ष 2024 मध्येही सोन्याची चमक कायम राहणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 03:28 PM2023-12-31T15:28:18+5:302023-12-31T15:29:23+5:30