जगातील सर्वात मोठी प्रिमिअम स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅपलने आज जोरदार धमाके केले आहेत. आयफोनच्या आतापर्यंतची सर्व मॉडेल बंद करून iPhone 14 ची महागडी सिरीज लाँच केली आहे. या आयफोनची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु होते, ती 1,89,900 रुपयांपर्यंत जाऊन थांबते. थांबा थांबा... तुम्हाला किंमत आधीच माहिती आहे. ते सांगणे हा आताचा मुद्दाच नाहीय. तुम्हाला दोन लाखांचा आयफोन हवा की एक कोटी रुपये? तुम्ही काय निवडाल...
या आयफोनच्या किंमतीत तुम्ही एक कोटी रुपये जमवू शकता. कसे? सांगतो ना... गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात की, हा पैसा तुम्ही योग्य जागी गुंतविला तर तुम्ही करोडपती बनू शकता. iPhone 14 Pro Max (1TB) मॉडेल विकत घेणार असाल तर त्याची किंमत सर्वाधिक म्हणजेच १.८९ लाख रुपये आहे. ही रक्कम जर तुम्ही अॅपलच्या मोबाईलमध्ये न खर्च करता कंपनीच्या शेअरमध्ये गुंतविली तर पुढच्या iPhone 15 च्या लाँचिंगवेळी तुमचे पैसे डबल झालेले असतील. म्हणजे तुमचे पैसे तसेच राहतील आणि त्याच पैशांत एक आयफोनही मिळेल. हा अंदाज कंपनीच्या स्टॉक हिस्ट्रीवर आधारित आहे.
ऍपलच्या शेअरनी गेल्या 3 वर्षांत इतकी तगडी कामगिरी केलीय की त्यावरून लोकांचे पैसे दुप्पट झालेत. 6 सप्टेंबर 2019 ला $53.32 वर असणारी शेअरची आज किंमत $154.53 एवढी झाली आहे. लोकांनी तिप्पट पैसे कमविले आहेत.
हे तर काहीच नाही...
आयफोनच्या रकमेची किंमत म्युच्युअल फंडाद्वारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून तुम्ही करोडपती होऊ शकता. 25 इक्विटी म्यूचुअल फंडांनी 2022 मध्ये २५ वर्षे पूर्ण केलीत. या काळात त्यांनी सरासरी १७ टक्के रिटर्न दिला. या आधारावर तुमचे १.९ लाख रुपये २५ वर्षांत 96,24,987 रुपये होतील. म्हणजे थोडे मागेपुढे केले तर तुम्ही करोडपती बनाल. मग काय निवडणार? आयफोन की म्युच्युअल फंड...