Gautam Adani: अनादी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी असलेल्या अंबुजा आणि एसीसी खरेदी केल्या. या दोन कंपन्या खरेदी केल्यानंतर अदानी देशातील दुसरे सर्वात मोठे सिमेंट उत्पादक झाले आहेत. आता माहिती मिळतीये की, अदानी यांनी कर्जबाजारी झालेल्या जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडचे सिमेंट युनिट खरेदी करणार आहेत.
लवकरच घोषणा होईल
गौतम अदानी, लवकरच याबाबत कंपनीशी करार करतील. या व्यवहाराशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, पोर्ट-टू-पॉवर ग्रुप सिमेंट ग्रायंडिंग युनिट आणि इतर छोट्या मालमत्तेसाठी सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा करार होऊ शकतो. या आठवड्यात कराराबाबत घोषणा होऊ शकते. या करारामुळे सिमेंट क्षेत्रात अदानी समूहाचे वर्चस्व आणखी वाढणार आहे.
भारतातील दुसरे सर्वात मोठे उत्पादक
अदानी यांनी मे महिन्यात स्वित्झर्लंडच्या होल्सिम लिमिटेडकडून अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी लिमिटेडची खरेदी केली होती. त्यानंतर आता 67.5 दशलक्ष टन उत्पादन क्षमतेसह अदानी भारतातील दुसरे सर्वात मोठे सिमेंट उत्पादक झाले आहेत. दरम्यान, अदानी समूहाच्या प्रतिनिधींनी अद्याप या नवीन करारावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. जयप्रकाश असोसिएट्सचे प्रतिनिधीही काही बोलायला तयार नाहीत.
कंपनी कर्जाच्या बोजाखाली
जयप्रकाश असोसिएट्सच्या सिमेंट ग्रायंडिंग युनिटची क्षमता वार्षिक 2 दशलक्ष टन आहे. ऑक्टोबर, 2014 मध्ये मध्य प्रदेशातील निग्री येथे हा प्लांट सुरू झाला होता. दरम्यान, सोमवारी स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल करण्यात आलेल्या माहितीनुसार, जयप्रकाश असोसिएट्सच्या बोर्डाने कर्ज कमी करण्यासाठी कंपनीचा सिमेंट व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आहे.