Gautam Adani Group Bond: जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला, पण आता गौतम अदानी यातून हळुहळू सावरत आहेत. दरम्यान, अदानी ग्रुप बॉन्ड मार्केटमधून 150 अब्ज रुपये उभारण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. हे चालू आर्थिक वर्षातच केले जाईल आणि समूह भारतीय रुपयात बाँड जारी करेल. या कालावधीत जमा झालेला पैसा कंपनीच्या भांडवली खर्चाच्या गरजा भागवण्यासाठी होईल.
कंपनी 5 अब्ज ते 10 अब्ज लॉटमध्ये हे बाँड जारी करण्याची योजना आखत आहे. जेणेकरून आर्थिक गरजा भागवता येतील. या बाँड्समध्ये कंपनी अनलिस्टेड आणि लिस्टेड असे दोन्ही बाँड जारी करणार आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे कंपनीला मोठा धक्का बसला, तेव्हापासून अदानी ग्रुप हे बाँड जारी करण्याच्या तयारीत होता.
विश्वास जिंकण्याचा प्रयत्न
हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे गमावलेला गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचा अदानी समूह प्रयत्न करत आहे. समूहाच्या या योजनेंतर्गत अवघ्या दोन महिन्यांत निधी उभारणीचा वेग आणखी वाढणार असल्याचे मानले जात आहे. याद्वारे कंपनी गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रुपने आतापर्यंत बाँडच्या विक्रीतून 12.5 अब्ज रुपये उभारले आहेत.
हिंडेनबर्गचा अहवाल चुकीचा
24 जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गने एक अहवाल जारी केला होता. यामुळे कंपनीला 100 अब्ज डॉलर्सचा मोठा तोटा सहन करावा लागला. या आरोपांबाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी हिंडेनबर्गचा अहवाल चुकीचा असल्याचे सांगून हिंडेनबर्गने आमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. आमची प्रतिष्ठा खराब करणे, हाच त्यांचा उद्देश होता, असेही अदानी म्हणाले.