Adani vs Hinderngerg : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गच्या (Hindenburg) रिपोर्टमुळे अदानी समूहाला सर्वात मोठा झटका बसला. यानंतर आता गौतम अदानी (Gautam Adani) आर-पारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अदानी समूहाने कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी अदानी समूहाने एका मोठ्या आणि महागड्या अमेरिकन लॉ फर्मची नियुक्ती केली आहे.
लॉ फर्म 'वॉचटेल'ला केले हायर
फायनान्शिअल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हिंडेनबर्गशी कायदेशीर लढाई लढण्यासाठी अमेरिकन लॉ फर्म वचटेलची(Wachtell) निवड केली आहे. ही फर्म जगातील प्रसिद्ध फर्म असून, विवादित प्रकरणांमध्ये कायदेशीर लढाईसाठीही सर्वात जास्त चर्चेत असते. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर गुंतवणूकदारांना पुन्हा समूहाकडे वळवण्यासाच्या दिशेने अदानींनी उचललेले हे मोठे पाऊल आहे.
कायदेशीर लढाई लढण्यास तयार
अदानी समूहाच्या वतीने आधीच सांगण्यात आले होते की, ते शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चविरुद्ध कायदेशीर लढा देण्याची तयारी करत आहेत. आता, रिपोर्टनुसार, समूहाने शॉर्ट सेलर फर्मला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी न्यूयॉर्कस्थित वाचटेल लिप्टन, रोसेन आणि काट्जच्या टॉप वकिलांची फौज उभी केली आहे. दरम्यान, 24 जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात अदानी समूहावर अकाउंटिंग फ्रॉड, स्टॉक मॅनिपुलेशनसह कर्जाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
हिंडनबर्गच्या रिपोर्टचा परिणाम
हिंडेनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर 88 प्रश्न उपस्थित केले. यानंतर अदानींच्या शेअर्सवर त्याचा एवढा वाईट परिणाम झाला की, 10 दिवसांत अदानी समूहाचे बाजार भांडवल निम्मे झाले. शेअर्सच्या जोरदार घसरणीचा चेअरमन गौतम अदानी यांच्या नेटवर्थवरही वाईट परिणाम झाला आणि ते जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या स्थानावरून टॉप-20 मधून बाहेर पडले. 110 अब्ज डॉलर्स संपत्ती असलेले अदानी यांची संपत्ती $58.7 बिलियनवर आली आहे.