Gautam Adani Investment in America : आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयानंतर मोठी भेट दिली आहे. ही भेट तब्बल 84 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची आहे. याची घोषणा स्वतः अदानी यांनी त्यांच्या X हँडलवरुन केली आहे. निवडणुकीतील विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करताना अदानी यांनी येत्या काही दिवसांत अमेरिकेत 10 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 84 हजार कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे.
10 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणाअमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अनेक भारतीय उद्योगपती खूप खूश आहेत. जो बायडेन यांच्या काळात ज्या संधी त्यांना दिसत नव्हत्या, त्या आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानंतर दिसत आहेत. अशा परिस्थितीत अदानी यांच्या या घोषणेकडे मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. गौतम अदानी यांनी बुधवारी अमेरिकेत ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या माध्यमातून 15,000 नोकऱ्या निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचेही अदानी यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले.
गौतम अदानी यांच्या या पोस्टनंतर हे स्पष्ट झाले आहे की, अदानी समूहाने भारत आणि अमेरिका यांच्यातील खोल व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी पावले उचलली आहेत. अमेरिकेत सुरू होणाऱ्या प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांनी दिली नसली, तरी ऊर्जा आणि पायाभूत सुविधांचा उल्लेख करुन त्यांनी या क्षेत्रात सातत्याने गुंतवणुकीच्या माध्यमातून द्विपक्षीय सहकार्याचे भारताचे वचन पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट केले.
युरोपियन उच्चायुक्तांची भेटदरम्यान, गौतम अदानी यांनी काल(12 नोव्हेंबर) युरोपियन युनियन, जर्मनी, डेन्मार्क आणि बेल्जियमच्या राजदूतांना अदानी समूहाच्या रिन्युएबल एनर्जी स्थळांच्या दौऱ्यावर नेले. त्यांनी गुजरातमधील खवरा येथील जगातील सर्वात मोठे रिन्युएबल एनर्जी आणि मुंद्रा येथील भारतातील सर्वात मोठ्या बंदराला भेट दिली. खवरा रिन्युएबल एनर्जी पार्क पूर्ण झाल्यावर 30 GW क्षमतेसह जगातील सर्वात मोठे एनर्जी पार्क असेल. हा प्रकल्प पॅरिसपेक्षा पाचपट मोठे क्षेत्र व्यापतो.