- पुष्कर कुलकर्णी
शेअर बाजारात आपल्या गुंतवणुकीतून सर्वोत्तम रिटर्न्स मिळावेत हाच एकमेव उद्देश गुंतवणूकदारांनी ठेवावा. यासाठी शेअरची निवड करून खरेदी केल्यावर ऊठसूट त्याचा भाव पाहू नका. रोज किती खाली आला, किती वर सरकला याकडे सतत पाहून नका. बँकेत एफडी ठेवल्यावर पाहता का असे? नाही ना? मग शेअरबाबतची ही अस्थिरता कशासाठी? सर्वोत्तम रिटर्न्स मिळविण्यासाठी अनेक वर्षे त्या कंपनीसोबत राहा. भाव खाली-वर होत राहणारच. आज इंग्रजी अक्षर ‘ई’पासून सुरू होणाऱ्या काही उत्तम कंपन्यांविषयी.
आयशर मोटर्स (EICHERMOT)
रॉयल इन्फिल्ड हे नाव सर्व परिचित आहे. ही दुचाकी बनविणारी कंपनी म्हणजेच आयशर मोटर्स लि. याचबरोबर आयशर या ब्रँड नावाने ट्रक, मिनी ट्रक, प्रवासी बसेस यांचे उत्पादन आणि विक्री ही कंपनी करते. ए बी व्होल्व्हो या कंपनीशी आयशरचे कोलॅबरेशन आहे.
फेस व्हॅल्यू : रुपये १/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रु. ३,७४५/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रु. ९५ हजार कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रु. ३,७३७/- आणि
लो २,१६०/-
बोनस शेअर्स : अद्याप बोनस शेअर दिले नाहीत.
शेअर स्प्लिट : १:१० या प्रमाणात ऑक्टोबर २०२० मध्ये
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल १९ पट रिटर्न्स मिळाले आहेत.
भविष्यात संधी : उत्तम. वाहन उद्योग एका फेजमधून जात असतो. कधी मंदी तर कधी तेजी. मंदीत घेतलेले शेअर्स भविष्यात जबरदस्त रिटर्न्स देऊन जातात. मात्र, यासाठी काही वर्षे वाट पाहावी लागते. याचबरोबर या शेअरमध्ये बोनस शेअर्स मिळण्याची संधीही आहेच.
इमामी लिमिटेड (EMAMILTD)
पर्सनल केअर, हेल्थ केअर आणि ब्युटी या सेगमेंटमध्ये या कंपनीचे उत्पादन आहे. बोरो प्लस, नवरत्न तेल, झंडू बाम, झंडू पंचारिष्ट, इमामी फेस क्रीम इत्यादी ब्रॅण्डस् बाजारात आपण पहिले असतील किंवा खरेदीही केले असतील.
फेस व्हॅल्यू : रु. १/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रु. ४६५.८०/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रुपये २१ हजार कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रु. ५७८/- आणि लो-३९३/-
बोनस शेअर्स : २००४ ते २०१८ दरम्यान तीन वेळा
बोनस शेअर्स दिले आहेत.
शेअर स्प्लिट : २०१४ आणि २०१० मध्ये
शेअर स्प्लिट केले आहेत.
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत गुंतवणूक अडीचपट वाढली आहे.
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी : पर्सनल हेल्थ केअर क्षेत्रात भारतातील बाजारपेठ वाढत आहे. यामुळे या कंपनीस भविष्यात बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्याची उत्तम संधी आहे. यात जितके यश मिळेल तितका शेअरचा भाव वाढलेलाही दिसेल.
एस्कॉर्टस खुबोटा लि. (ESCORTS)
पॉवरट्रॅक आणि फार्मट्रॅक ही दोन ट्रॅक्टर्स, तसेच रेल्वे, शेती, बांधकाम यासाठी आवश्यक मशिनरी आणि वाहन उद्योगासाठी आवश्यक उत्पादने हा या कंपनीचा व्यवसाय आहे..
फेस व्हॅल्यू : रुपये १०/-
सध्याचा भाव : रु. १,९९६.२०/-
मार्केट कॅप : २७ हजार कोटी रुपये.
भाव पातळी : वार्षिक हाय रु. २,१९०/- आणि
लो - १,३०६/-
बोनस शेअर्स : १,९९७ पर्यंत पाच वेळा दिले आहेत.
शेअर स्प्लिट : अद्याप नाही.
रिटर्न्स : गेल्या १० वर्षांत तब्बल ३० पट
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी : शेअर स्प्लिटची संधी असून, मागील १० वर्षांचा चार्ट पॅटर्न पाहता भविष्यात चांगला परतावा देण्याची संधी या शेअरमध्ये आहे.
गुंतवणुकीसाठी इतर कंपन्यांची नावे: एक्साइड इंडस्ट्रीज ही बॅटरी बनविणारी कंपनी आहे. भविष्य बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचे आहे. या कंपनीने जर यात रिसर्च करून आपला व्यवसाय त्यादृष्टीने वाढविला, तर यातील गुंतवणूक भविष्यात फायद्याची ठरू शकेल. गुंतवणूकदारांनी यावर लक्ष ठेवावे.