Join us

2023 मध्ये सोन्याने दिला 13% परतावा, 2024 मध्ये गुंतवणूक करावी का? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 5:32 PM

Gold Investment: 2023 मध्ये सोन्याच्या किमतीत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले.

Gold Investment: येत्या काही तासात 2024 वर्षाला सुरुवात होईल. या सरत्या वर्षात सोन्याच्या किमतीत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. यावर्षी MCX गोल्डने 13.55% परतावा देऊन Comex Gold पेक्षा किंचित चांगली कामगिरी केली. तर, कॉमेक्स गोल्डने 11.70 टक्के परतावा दिला. विशेष म्हणजे, यंदा सोन्याने 64,063 रुपयांची सर्वोच्च पातळी आणि 54,771 रुपयांची नीचांकी पातळीही गाठली.

सोन्यात सध्या गुंतवणूक करावी का?गेल्या काही वर्षांत महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास संघर्ष, अशा अनेक अनपेक्षित घटनांचा सामना बाजाराला करावा लागला आहे. याशिवाय, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरांबाबत कठोर भूमिका घेतली आणि गेल्या वर्षभरात एकत्रितपणे 1,700 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली. अशा अनिश्चिततेच्या वातावरणातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली. 

यामुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे. 2023 च्या पहिल्या तीन तिमाहीत सुमारे 800 टन सोने खरेदी करण्यात आले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% अधिक आहे. दरम्यान, यंदा सोन्याने कठीण परिस्थितीतही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिल्यामुळे सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोतीलाल ओसवाल यांच्या मते, भू-राजकीय तणाव, डॉलरचा निर्देशांक, दर कपातीची अपेक्षा, मध्यवर्ती बँकांमधील सोन्याची स्पर्धा, अशा वातावरणात सोन्याची किंमत वाढू शकते. परंतू, तज्ञ व्यक्तींच्या एकूण पोर्टफोलिओपैकी सुमारे 10-15% सोन्यात गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. 

(टीप- लोकमत कुठल्याही प्रकारच्या गुंतवणूकीचा सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या आवश्य घ्या.)

टॅग्स :सोनंगुंतवणूकव्यवसायपैसा