Join us  

Gold Investment : शेअर बाजाराच्या घसरणीच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल, मिळाला बंपर रिटर्न; आणखी वाढणार दर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 9:28 AM

शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरतेमध्ये सोनं हा मजबूत परतावा देणारा सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. पाहा सोन्याचे दर अजून किती वाढणार काय म्हणतात जाणकार.

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये सोन्याच्या किमतीत दुहेरी अंकी वाढ नोंदवण्यात आली आहे. शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरतेमध्ये सोनं हा मजबूत परतावा देणारा सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. निफ्टी आणि सेन्सेक्सनं आर्थिक वर्ष २३ मध्ये मोठ्या प्रमाणावर निगेटिव्ह रिटर्न दिले, तर उच्च आर्थिक जोखमींमुळे सोन्याच्या किमती १५ टक्क्यांपर्यंत वाढल्या. आता आर्थिक वर्ष २०२४ सराफा बाजारासाठी आकर्षक दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढू शकतात.

आर्थिक वर्ष २३ मध्ये, सोन्याचा भाव २९५ रुपये किंवा ०.४९ टक्क्यांच्या किंचित घसरणीसह ५९,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता. परंतु वायदा बाजारात भाव ६०,०६५ रुपयांपर्यंत वाढले होते. यूएस फेडरल रिझर्व्ह आणि इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदराबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सोन्याची खरेदी वाढली असून, भाव वाढले आहेत.

१५ टक्क्यांचे रिटर्नतज्ज्ञांच्या मते, गेल्या आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत ५२००० ते ६०००० रुपयांपर्यंत मोठी झेप घेतली आहे. म्हणजेच सोन्यानं एकूण १५ टक्के परतावा दिलाय. तर निफ्टीनं आर्थिक वर्ष २३ मध्ये निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. यामागचं कारण म्हणजे रशिया-युक्रेन युद्धातून निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक पातळीवर महागाईचा दर वाढला.

महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केलीये. यानंतर जागतिक मंदीच्या भीतीचे ढग दाटून आले. संकटाची परिस्थिती पाहता जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आणि त्याचे भाव गगनाला भिडले.

६८ हजारांपर्यंत जाऊ शकतात भावसुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून, व्याजदराच्या दृष्टीने सोनं अजूनही आकर्षक दिसतं. जागतिक पातळीवर चलनवाढीचा दर अजूनही उच्च पातळीवर आहे. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बेस केस परफॉर्मन्सवर आधारित सोन्याच्या किमती पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजे आर्थिक वर्ष २०२४ च्या अखेरपर्यंत सहजरित्या ६६०००-६८००० पर्यंत पोहोचू शकतात. बाजारात तेजीत राहिल्यास सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना २० टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

टॅग्स :सोनंव्यवसाय