विनायक कुळकर्णी, गुंतवणूक समुपदेशक
भांडवली बाजारामध्ये सातत्याने तेजी दिसून येत आहे. थेट शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातदेखील गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. मात्र, असे असले तरीही भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले सोने, आजही गुंतवणुकीतील आपली चमक राखून आहे. किंबहुना आता केवळ वळे किंवा दागिना एवढ्यापुरतीच सोन्याच्या गुंतवणुकीची व्याप्ती राहिलेली नाही; तर त्याच्या गुंतवणुकीतही वैविध्य आले आहे.
सोन्यातील गुंतवणुकीचा प्रकार निश्चित करताना गोल्ड सोवेरिन बॉण्ड, धातुरूपातील सोने, ई-गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ युनिट्स यांच्या बरोबरीने स्थानिक सराफ आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याचा दर यांत तीन ते चार टक्क्यांचा पडणारा फरक लक्षात घेतला जातो. ब्रँडेड कंपन्यांचे सोन्याचे अलंकार किमान पंधरा-वीस टक्क्यांनी महाग पडतात. फक्त गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडांची युनिट्स खरेदी करताना जागतिक बाजारातील सोन्याच्या दराशी संलग्न दर मिळतो. २००६ मध्ये भारतात गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडाची संकल्पना येऊन आता १७ वर्षे झाली. तरीही हे सुरक्षित आणि सुलभ गुंतवणूक साधन सर्वसाधारण गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचलेले नाही. चलनवाढीवर उतारा म्हणून केवळ रोकडसुलभ सोनेच नव्हे तर शेअर्स आणि म्युच्युअल फंडांत नियोजनबद्ध गुंतवणूक केली; तर एकीकडे संपत्ती निर्माण होऊ शकते, तर दुसरीकडे अडीअडचणीला उपयोगात आणता येते; परंतु आजही लोक सोन्याकडेच अधिक आकृष्ट होतात.
गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड
या शुद्धतेचा दर्जा प्रमाणित असल्याने गुंतवणूकदार निर्धास्त असतो. एक ग्रॅम सोन्याचे एक गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचे एक युनिट या परिमाणाने डीमॅट खात्यात व्यवहार केले जातात. शेअर बाजारात या युनिटस्ची खरेदी-विक्री करता येते. गोल्ड ईटीएफ युनिट्स किंवा ई-गोल्ड युनिटस्ची डीमॅट स्वरूपात खरेदी आणि विक्री करताना आंतरराष्ट्रीय सोन्याच्या दराशी निगडित असणारे मूल्यांकन गुंतवणूकदाराच्या फायद्याचे ठरू शकते.
सोन्याच्या शुद्धतेची हमी गोल्ड फ्युचर्स आणि गोल्ड ईटीएफमध्ये असते तशी आणि तेवढी हमी सराफांच्या अलंकारावर अपेक्षित करता येत नाही. सोन्याच्या किमतीवर अधिमूल्य देऊन होणारी खरेदी गोल्ड ईटीएफ युनिट्स किंवा ई-गोल्ड युनिट्सच्या बाबतीत होत नाही. सराफागणिक बदलणारी किंमत वस्तू आणि सेवा करांसह (जीएसटी) दागिने – अलंकारांसाठी सोन्याच्या मूळ किमतीवर अधिमूल्यानेच आकारलेली असते. त्याशिवाय घडणावळ शुल्क वेगळे द्यावे लागते. संपत्ती, कर गोल्ड ईटीएफ युनिट्स, सोवरीन बॉण्डस (मुदतीअखेरपर्यंत) आणि गोल्ड फ्युचर्सना अजिबात लागू नाही. हा संपत्ती कर ई-गोल्ड युनिटस्ना तसेच अलंकार, दागिने आणि धातुरूपातील सोन्यास (वळी, बिस्किट्स, चिप्स किंवा लगडी) लागू आहे.
सोने साठवणुकीची गरज नाही
गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना सोने प्रत्यक्ष धातुरूपात किंवा अलंकारांच्या स्वरूपात (नॉमिनेशन) न घेता डीमॅट खात्यात घेता येते. या सोन्याची शुद्धता ९९ टक्के इतकी असते.
दीर्घ अवधीचा भांडवली नफा कर फायदा गोल्ड ईटीएफ युनिट्सना तीन वर्षांनंतर घेता येतो. गोल्ड ईटीएफ युनिट्सना आणि गोल्ड फ्युचर्स डीमॅट स्वरूपात असल्याने साठवणुकीची गरज नसते. डिपॉझिटरीत असल्याने गोल्ड ईटीएफ युनिट्सना आणि गोल्ड फ्युचर्सना नामांकनाची (नॉमिनेशन) सुविधा आहे. आवश्यकता नसताना धातुरूपातील सोने खरेदी टाळून डिमॅट स्वरूपात केलेली सुवर्णखरेदी नेहमीच सर्वच दृष्टींनी सुरक्षित, योग्य आणि दीर्घ अवधीत करलाभ देणारी ठरते.
१०टक्केपर्यंतचा आपल्या संपत्तीचा हिस्सा सोन्यासाठी राखून ठेवणे कधीही योग्य ठरते. अर्थात हा हिस्सा गोल्ड ईटीएफ युनिटस्मध्ये असेल तर सोन्याहून पिवळे म्हणता येईल.
८८ रुपये ते ६१,००० रुपये तोळा
एकीकडे १९४७ मध्ये ८८ रुपये तोळा असलेले सोने आज ६१ हजार रुपयांवर पोहोचलेले असल्याने ७५ वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेली ६८० पट वाढ भले कितीही आकर्षक वाटली तरी यापेक्षा जास्त पटींनी शेअर्स निर्देशांकाने वाढ दर्शविली आहे, हेपण दुर्लक्षून चालणार नाही.