Gold Price: अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमुळे सोन्याच्या किंमतीने सर्व विक्रम मोडले आहेत. कामकाजाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ६,२५० रुपयांनी वाढून ९६,४५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या विक्रमी स्तरावर पोहोचला. अखिल भारतीय सराफा संघानं यासंदर्भातील माहिती दिली.
काय म्हणतात तज्ज्ञ?
अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीचा मजबूत पर्याय म्हणून मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. यामुळे देशांतर्गत किमती वाढल्याचं त्यांनी नमूद केलं. बुधवारी ९९.९ टक्के शुद्धतेचं सोनं ९०,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.
चार दिवसांच्या प्रचंड घसरणीनंतर ९९.५ टक्के शुद्धतेचं सोनं ६,२५० रुपयांनी वधारलं आणि ९६,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांकी स्तर ओलांडला. मागील सत्रात सोन्याचा भाव ८९,७५० रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झाला होता.
चांदीच्या दरात वाढ
जागतिक ट्रेंडनुसार चांदीचा भावही २,३०० रुपयांनी वधारून ९५,५०० रुपये प्रति किलो ग्रॅम झाला. मागील सत्रात चांदी ९३,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी सराफा बाजार बंद होते. कोटक सिक्युरिटीजचे कमॉडिटी रिसर्चचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट कायनात चैनवाला यांच्या म्हणण्यानुसार, "कॉमेक्स सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. याचं कारण अमेरिका-चीन व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय समजल्या जाणाऱ्या सोन्याची वाढती मागणी आहे. यापूर्वी २ एप्रिल रोजी दर ३२०० डॉलर प्रति औंसच्या पुढे गेले होते, पण नंतर नफावसुलीमुळे ते खाली आले."
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध
गुरुवारी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चिनी वस्तूंवर १४५ टक्क्यांपर्यंत शुल्क लावलं होतं, ज्याला चीननं प्रत्युत्तर देत १२५ टक्क्यांपर्यंत शुल्क लावलं. शुल्क युद्धाची वाढती चिंता आणि जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीमुळे अमेरिकी डॉलर निर्देशांक १०० अंकांच्या खाली घसरला, असे चैनवाला यांनी सांगितलं. यामुळे सराफा भावाला आणखी आधार मिळाला.
इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी यूबीएसच्या मते, व्यापार आणि आर्थिक अनिश्चितता, महागाईची भीती, मंदीचा धोका आणि भूराजकीय तणाव यासारख्या वित्तीय बाजारात सुरू असलेल्या चिंतांमुळे सोन्याचं आकर्षण वाढण्याची शक्यता आहे.