Gold in Dubai:भारतीयांचे 'गोल्ड लव्ह' जग जाहीर आहे. लग्न समारंभ असो वा इतर कुठलाही कार्यक्रम, भारतीयांनासोनं अंगावर घालण्याची मोठी हौस आहे. काहीजण सोन्यात गुंतवणूकही करतात. दरम्यान, भारतातील अनेकांचा असा समज आहे की, दुबईमध्ये सोन्याचे दर खूपच कमी आहेत. पण खरंच असं आहे का...?
भारतातून दरवर्षी लाखो लोक दुबईला भेट देण्यासाठी किंवा कामासाठी जातात. 2022 मध्ये ही संख्या 12 लाखांहून अधिक होती. जगभरातून दुबईला भेट देणाऱ्या परदेशी प्रवाशांची ही सर्वात मोठी संख्या आहे. भारतापेक्षा दुबईत सोनं स्वस्त आहे, असा तुमचाही विश्वास असेल तर चला किंमत तपासूया. आज सकाळी दुबईत सोन्याचा भाव प्रति औंस 40.37 दिरहमने वाढला. एका औंसमध्ये 28.3 ग्रॅम सोने असते, तर भारतात याची किंमत 10 ग्रॅमच्या युनिटमध्ये निश्चित केली जाते.
दुबईच्या बाजारात सोन्याचा भाव 40.37 दिरहम म्हणजेच सुमारे 901.37 रुपयांनी वाढून 7,410 दिरहम प्रति औंसवर पोहोचला. रुपयात ही किंमत 1.65 लाख रुपये प्रति औंस होती, म्हणजेच 28.3 ग्रॅम सोन्याची किंमत 1.65 लाख रुपये होती. म्हणजेच एक ग्रॅम सोन्याचा भाव 5,830 रुपयांच्या आसपास बसेल.
भारतात सोन्याचा दर किती आहे?
आता भारतातील सोन्याची किंमत पाहू. सध्या MCX वर सोन्याचा भाव 60,943 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. अशाप्रकारे एका ग्रॅमची किंमत 6,094 रुपये झाली. आता तुम्ही विचार करत असाल की, दुबईत सोन्याची किंमत खरोखरच स्वस्त आहे. पण आता हिशोब कुठे पूर्ण झाला? जर तुम्ही दुबईतून सोनं विकत आणण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, तुम्ही दुबईहून एका मर्यादेतच सोनं तुमच्यासोबत आणू शकता.
दुबईहून भारतात शुल्क मुक्त सोनं आणण्याची मर्यादा पुरुषांसाठी फक्त 20 ग्रॅम आहे, तर महिलांसाठी 40 ग्रॅम आहे. यापेक्षा जास्त सोनं आणल्यास तुम्हाला मोठा कर भरावा लागेल. भारतात सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क, कृषी उपकर आणि टीडीएस सारखे कर आकारले जातात. दुबईतून सोनं खरेदी करण्याचा एक फायदा असा आहे की, येथील सोन्याच्या बाजारात सोनं आंतरराष्ट्रीय किमतीनुसार विकले जाते. दुबई सरकार सोन्यावर एकसमान 5 टक्के व्हॅट आकारते. सोन्याच्या बिस्किटे किंवा कच्च्या मालावर कोणताही कर नाहीत. याशिवाय दुबईमध्ये सोनं बनवण्याचे शुल्कही कमी आहे, कारण येथे स्वस्त मजूर उपलब्ध आहेत. त्यामुळे लोक दुबईतून सोनं खरेदी करण्यास प्राधान्य देतात.