Gold Price Review: गेल्या महिन्याभरात सोनं ४००० रुपयांपेक्षा जास्त महाग झालं आहे. ही वाढ जवळपास दुप्पट झाली. एका महिन्यात चांदी ७१०२ रुपये प्रति किलोवर पोहोचली. आज आयबीजेए गांधी जयंतीच्या निमित्तानं सोन्या-चांदीचे दर जाहीर करणार नाही. इस्रायल-इराणमधील वाढत्या तणावानंतर आता यांची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सोन्याचा भाव वाढून ७५,५१५ रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला. चांदी ८९,८८२ रुपयांवर बंद झाली. महिनाभरापूर्वी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१,५११ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ८२,७८० रुपये होता. या सोन्या-चांदीच्या दरावर जीएसटीचा समावेश नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.
सहा महिन्यांत १०.७५ टक्क्यांची तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी स्पॉट गोल्ड २,६३४ डॉलर प्रति औंस वर बंद झालं, तर एमसीएक्सवर सोनं ७४,९२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सोमवारी शेवटचा व्यवहाराचा दिवस होता. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे १०.७५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून तो ६७,६७७ रुपयांवरून ७४,९२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. स्पॉट सोन्याचा भाव २,२३३ डॉलरवरून २,६३४ डॉलर प्रति औंस झाला आहे, यानं आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे १७.५०% वाढ नोंदविली आहे.
सोन्या-चांदीच्या दरात वाढ का?
लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे कल वाढला आहे. कारण वाढता भूराजकीय तणाव आणि घसरत चाललेले व्याजदर या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँकांनी जागतिक पातळीवर भरपूर सोनं राखीव ठेवलं आहे. विशेषत: आर्थिक अनिश्चितता, महागाई आणि भूराजकीय तणावाच्या काळात सोनं पारंपारिकपणे सुरक्षित मालमत्ता मानलं जातं.
यावर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत जागतिक स्तरावरील मध्यवर्ती बँका सक्रियपणे सोनं खरेदी करत आहेत. भारतानं ४२.६ दशलक्ष टन सोनं खरेदी केलं आहे, तर चीननंही आपली खरेदी तात्पुरती थांबवण्यापूर्वी २८.९ दशलक्ष टन सोनं खरेदी केलं आहे.