Join us  

Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 3:52 PM

Gold Price Correction : नवरात्र आणि दिवाळीत सोन्याचे दर वाढतात. परंतु आता सोनं खरेदी करणारे, लग्नासाठी दागिने खरेदी करणारे किंवा सोन्यात गुंतवणूक करणारे सर्व जण सोन्याचे दर घसरण्याची वाट पाहत आहेत.

Gold Price Correction : नुकताच सोन्याचा भाव ७८,४५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. नवरात्र आणि दिवाळीत सोन्याचे दर वाढतात. परंतु आता सोनं खरेदी करणारे, लग्नासाठी दागिने खरेदी करणारे किंवा सोन्यात गुंतवणूक करणारे सर्व जण सोन्याचे दर घसरण्याची वाट पाहत आहेत. जर तुम्हाला सोनं खरेदी करण्याची घाई नसेल, तर तुम्ही थोडी वाट पाहू शकता. सोन्यावर लवकरच ५,००० रुपयांपर्यंत करेक्शन दिसू शकते. म्हणजेच सोनं ७०,००० रुपयांच्या पातळीवर येऊ शकतं.

सोन्याच्या किंमतीत येऊ शकते करेक्शन

मोतीलाल ओसवाल यांच्या रिपोर्टनुसार, या स्तरावर सोन्याच्या दरात काही काळ स्थिरता दिसू शकते. मात्र लवकरच सोनं ५ ते ७ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. म्हणजेच सध्याच्या दरानुसार हिशोब केल्यास सोन्यात ५००० रुपयांपेक्षा जास्त घसरण होऊ शकते. २००० नंतर सोन्यावर ३२ टक्के वार्षिक परतावा मिळालेला नाही, असं या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे सोन्यात घसरण होण्याची शक्यता आहे.

का वाढताहेत दर?

रिपोर्टमध्ये आगामी अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक, देशांतर्गत ईटीएफ आयात, एसपीडीआर होल्डिंग्स आणि सीएफटीसी पोझिशन्स अशा अनेक कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्यांत सोन्याच्या किंमती वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हची धोरणं आणि भूराजकीय परिस्थिती हे आहेत. मध्यवर्ती बँकांकडून भविष्यातील मागणी आणि देशांतर्गत सण आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे बाजाराची धारणा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

२ वर्षात सोनं ८६,००० रुपयांवर पोहोचणार

मोतीलाल ओसवाल यांनी पुढील दोन वर्षांत सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम ८६,००० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात जोरदार मागणी मुळे या तेजीला आणखी चालना मिळत आहे. ग्रामीण भागातही सोन्याच्या मागणीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. अनुकूल मान्सून आणि चांगल्या पीक पेरणीमुळे ग्रामीण आर्थिक स्थिती भक्कम होऊ शकते. भारतीय गोल्ड ईटीएफमध्येही गुंतवणूकदारांचा रस वाढला आहे. विशेषत: नुकत्याच केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्क कपात आणि ईटीएफवरील करसवलत देण्यात आल्यानंतर यात बदल दिसल्याचंही यात नमूद करण्यात आलंय.

टॅग्स :सोनं