Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मंगळवारी जोरदार वाढ झाली. दिल्लीत सोन्याची किंमत 1,400 रुपयांनी वाढून 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली. शुक्रवारी हा दर 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. दुसरीकडे, चांदीचा भावही 3,150 रुपयांनी वाढून 87,150 रुपये प्रतिकिलो झाला आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आर्थिक वर्ष 2025 च्या वार्षिक अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या किमतीत घसरण सुरुच आहे. 23 जुलै रोजी हा सोन्याचे दर 3,350 रुपयांनी घसरुन 72,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले होते. दरम्यान, मंगळवारी 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रत्येकी 1,400 रुपयांनी वाढून अनुक्रमे 74,150 रुपये आणि 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
भाव का वाढले?
स्थानिक ज्वेलर्सकडून वाढती मागणी, तसेच जागतिक ट्रेंडमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जागतिक आघाडीवर, सोने प्रति औंस $18.80 ने वाढून $2,560.10 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, यूएस फेडरल रिझर्व्ह (फेड) द्वारे आक्रमक व्याजदर कपातीच्या अपेक्षेने मंगळवारी सोन्यामध्ये वाढ झाली.