Join us  

सोन्या-चांदीचे दर सलग दुसऱ्यांदा पडले; 10 ग्रॅमचा भाव इतका घसरला, तुमच्या शहरातील किमती काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:46 AM

Gold Price Down: तुम्ही सणासुदीत सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी आहे. कारण, दोन दिवसांच्या वाढीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Gold Price Today : गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीला चांगलीच झळाली मिळाली. आठवड्याभरात सोन्यात तब्बल २ हजार रुपयांची वाढ झाली. अशात तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेद करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कारण, २ दिवसांच्या जोरदार वाढीनंतर मंगळवारी (17 सप्टेंबर) सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने आणि चांदी दोन्ही वायदा बाजारात घसरणीसह व्यवहार करत होते. सोन्याचा भाव 109 रुपयांनी घसरून 73,387 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. काल ते 73,496 वर बंद झाला होता. या काळात चांदीचा भाव 160 रुपयांनी घसरून 89,449 रुपये प्रति किलोवर नोंदवला गेला. काल तो 89,609 रुपयांवर बंद झाला. तुमच्या शहरातील दर काय आहेत?

मुंबईत सोने-चांदी दरात घसरणमुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,865 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,489 रुपये प्रति ग्रॅम आहे. केवळ मुंबईतच नाही तर देशभरातील लोकांमध्ये सोने खरेदी करण्याचा उत्साह दिसत आहे. देशातील प्रत्येक शहराचे दर हे तेथील सराफाबाजारानुसार ठरतात. त्यामुळे ते वेगवेगळे असू शकतात. चांदीचा भाव आज 92 रुपये प्रति ग्रॅम म्हणजे 92,000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मुंबई ही चांदीची मोठी बाजारपेठ आहे. देशात आयात होणारी चांदी मुंबईमार्गेच देशातील सर्व ठिकाणी पोहोचते. बेल्जियम आणि जर्मनी व्यतिरिक्त विविध देशांतून चांदीची आयात भारतात केली जाते.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (Indian Standard Organization) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध मानले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी ते दागिने घडवण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

मिस्ड कॉलवरून किंमत जाणून घ्या22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, सतत अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

हॉलमार्ककडे लक्ष द्यासोने खरेदी करताना त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिलं पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याच्या शुद्धतेची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते.