Join us  

नवरात्रीदरम्यान सोन्याचे दर आजवरच्या उच्चांकी पातळीवर; पहिल्यांदाच ओलांडला ₹७८,४०० चा टप्पा, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 3:16 PM

Gold Silver Rates : सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवामुळे ज्वेलर्स आणि किरकोळ ग्राहकांची खरेदी वाढल्यानं सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

Gold Silver Rates : सणासुदीच्या काळात दागिन्यांना मागणी वाढल्यानं दिल्लीत सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव १५० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७८,४५० रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी सोन्याचा भाव ७८,३०० रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झाला होता. चांदीचा भावही १,०३५ रुपयांनी वधारून ९४,२०० रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे. मागील सत्रात चांदी ९३,१६५ रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाली होती. याशिवाय ९९.५ टक्के शुद्धतेचे सोनं २०० रुपयांनी वधारून ७८,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं.

सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवामुळे ज्वेलर्स आणि किरकोळ ग्राहकांची खरेदी वाढल्यानं सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत १३१ रुपये म्हणजेच ०.१७ टक्क्यांनी वाढून ७६,३७५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

भारतात सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यामुळे बाजारात जोरदार स्पॉट मागणीमुळे चांदीत वाढ झाल्याचं आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे एव्हीपी (कमोडिटीज अँड करन्सीज) मनीष शर्मा यांनी सांगितलं. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी चांदी २१९ रुपये म्हणजेच ०.२४ टक्क्यांनी वाढून ९३,१९७ रुपये प्रति किलो झाली. 

पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि सुरक्षित गुंतवणूकीची मागणी यामुळे सोन्याचे दर स्थिर आहेत. मात्र, परदेशी बाजारात चांदीच्या दरात घसरण झाली असून तो ३२.३७ डॉलर प्रति औंस वर बंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे कमोडिटी एक्स्पर्ट मानव मोदी यांनी सांगितलं.

टॅग्स :सोनंचांदी