Gold Price : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या किमतीपासून शेअर बाजारापर्यंत ट्रम्प यांच्या आगमनामुळे बरीच उलथापालथ होत आहे. पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि इतर देशांविरुद्ध सर्वसमावेशक व्यापार शुल्क लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे, तर अमेरिकन डॉलरला तोटा सहन करावा लागला आहे.
ET च्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याची किंमत प्रति औंस २,७०७.१९ डॉलरवर स्थिर आहे. दुसरीकडे, अमेरिकन सोन्याचे फ्युचर्स ०.७% घसरून २,७३० डॉलर्सवर आले.
व्यापार शुल्काची टांगती तलावर
अमेरिकेतील निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प काही देशांवर व्यापार शुल्क (टॅरिफ) लादतील, अशी चर्चा गेल्या अनेक आठवड्यांपासून जगभरात सुरू होती. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी यावर काही काळ विराम दिला असून या मुद्द्यावर आणखी वेळ घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यानंतर जागतिक शेअर बाजारात दिलासा मिळाला. पण अमेरिकन डॉलरवर दबाव दिसून आला. दुसरीकडे डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याच्या दरातही वाढ दिसून आली.
भारतात सोन्याचे भाव थांबेना
भारतात सोन्याच्या किमतीतील वाढीचा कल कायम आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, देशातील बहुतांश शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत सुमारे ८१,३०० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची किंमत ७५,००० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
गेल्या ३ वर्षात जगभरातील वाढत्या भौगोलिक-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. २०२० मध्ये सोन्याचा भाव ५०००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता, जो आता ८०००० रुपयांच्या पुढे गेला आहे. दुसरीकडे, अमेरिकेत ट्रम्प राजवट आल्यानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे.