Gold-Silver Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा बदल झालाय. आज २४ कॅरेट सोन्यानं आणखी एक इतिहास रचत ८६४३० रुपयांचा उच्चांक गाठला. मात्र, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज, १९ फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७४० रुपये प्रति १० ग्रॅमनं वाढून ८६,४३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदी ९७७ रुपयांनी वधारून ९७,००० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. एकट्या फेब्रुवारी महिन्यात सोनं ४३४४ रुपयांनी महागलंय.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) हा दर जाहीर केला आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.
आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ७३७ रुपयांनी वाढून ८६,०८४ रुपये झालाय. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भावही ६७८ रुपयांनी वाढून ७८,४९२ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५५५ रुपयांनी वाढून ६४,८२३ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता ४३३ रुपयांनी वाढून ५०,५६२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
सोनं १०,६९० रुपयांनी महागलं
या तेजीमुळे यंदा आतापर्यंत सोनं १०,६९० रुपयांनी महागलं. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. ३१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा भाव ८२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता.