Gold Rate In 2025: आर्थिक वर्ष २०२५ मध्ये शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. या घसरणीत दिग्गज कंपन्याही आपलं स्थान राखू शकल्या नाहीत. बहुतेक गुंतवणूकदारांचे पोर्टफॉलिओ लाल रंगात गेले. मात्र, दुसरीकडे सोन्याची किंमत रोज नवीन विक्रम करत आहे. परताव्याच्या बाबतीत सोन्याने म्युच्युअल फंडांनाही मागे टाकल्याचे दिसत आहे. वार्षिक आधारावर सोन्याने सुमारे २५ टक्के परतावा दिला आहे. देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूची किंमत प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांकडे वाटचाल करत आहे. पुढील काळात सोन्याचा भाव वाढेल की कमी होईल? चला जाणून घेऊया.
सोन्याची किंमत रेकॉर्डब्रेक हायवरसोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीकडे पाहिल्यास, गेल्या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली होती. ५ जून रोजी एक्सपायरी असलेल्या सोन्याची किंमत ९५,९३५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली होती. केवळ एप्रिल महिन्यातच सोने ५००० रुपयांनी महाग झाले आहे. १ एप्रिल रोजी एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याची किंमत ९०,८७५ रुपये होती. तर २०२५ च्या सुरुवातीला, ते ७८००० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते.
सोने लाखाच्या पुढे जाईल?देशांतर्गत बाजारातही सोने सतत नवीन उंची गाठत आहे, गेल्या आठवड्यात दिल्लीच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ९८००० रुपयांच्या पुढे गेला. जर सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची ही गती अशीच राहिली तर लवकरच १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकते.
देशांतर्गत बाजारात सोन्याचा भावइंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन IBJA.Com च्या वेबसाइटनुसार, देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ९९९ शुद्धतेचे २४ कॅरेट सोने ९४,९१० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९२,६३० रुपये आणि २० कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८४,४७० रुपये झाला. देशांतर्गत बाजारात १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७६,८८० रुपये आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन दररोज सोने आणि चांदीच्या किमतींची माहिती देते. येथे तुम्हाला कर आणि शुल्काशिवाय सोने आणि चांदीचे दर सांगितले आहेत. तर IBJA द्वारे जारी केलेले दर देशभरात सारखेच आहेत. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी केली किंवा बनवली तर तुम्हाला मेकिंग चार्जेसवर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतील.
सोने का खातोय भाव?सोन्याचे भाव इतक्या वेगाने का वाढत आहेत? असा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल. कोणत्याही अनिश्चिततेच्या किंवा भू-राजकीय जोखमीच्या, व्यापारातील तणावाच्या किंवा आपत्तीच्या काळात, सोने हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. सध्याही ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी युद्धाचा भडका उडाला आहे. याशिवाय जगभरातील शेअर बाजारात गोंधळ आहे. महागाईबद्दल चिंता वाढली आहे. अमेरिकन डॉलर देखील त्याच्या उंचीवर पोहोचल्यानंतर सतत घसरत आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या दरात वाढ होण्याच्या स्वरूपात दिसून येत आहे.