नवी दिल्ली-
रुपयाच्या तुलनेत डॉलरचं मजबूत होणं आणि भारतीय चलनात सातत्यानं तूट होत असताना मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या दरातही उतार-चढाव पाहायला मिळत आहे. या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात म्हणजेच शुक्रवारी सोन्याच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोन्याचा भाव गेल्या सहा महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर गेला होता. त्यानंतर सोन्याचा भाव शुक्रवारी प्रती १० ग्रॅम सोन्यासाठी ४९,३९९ रुपयांवर बंद झाला. एमसीएक्सवर सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ४९,२५० रुपयांपर्यंत खाली पोहोचला होता. हा दर गेल्या सहा महिन्यातील सर्वात कमी नोंदवला गेला.
सोन्यातील घट अशीच सुरू राहील
सोन्याचा सध्याचा दर १,६३९ डॉलर प्रति औंसच्या इंट्रा डे लो वर पोहोचला होता. कमोडिटी मार्केटच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार सोन्याच्या किमतीत येत्या काळातही घट पाहायला मिळू शकते. जागतिक मंदी, महागाई आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या कारणांमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झालेला पाहायला मिळू शकतो.
किती कमी होईल किंमत?
मार्केट तज्ज्ञांनुसार डॉलरचं मजबूतीकरण आणि वाढत्या यूएस बॉन्ड यील्डमुळे गुंतवणुकदारांमध्ये उत्सुकता कमी झाली आहे. डॉलर इंडेक्स २० वर्षांच्या आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. सोन्याच्या किमतीत दोन वर्षांच्या तुलनेत निच्चांकी पातळीवर आहेत. अशात तज्ज्ञांनी गुंतवणुकदारांना सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मतानुसार स्थानिक बाजारात सोन्याचा दर ४८ हजारांपेक्षा कमी होऊ शकतो.
फेब्रुवारीपासून सातत्यानं घसरण
रशिया-युक्रेनच्या युद्धाचे परिणाम सोन्याच्या किमतीवरही पाहायला मिळाले. फेब्रुवारी २०२२ च्या अखेरीस भारतात सोन्याच्या किमतीत घट पाहायला मिळाली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा दर ५५ हजार रुपये इतका होता. सध्या हा दर ५० हजार रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.