Gold Silver Price : देशाची राजधानी दिल्लीत गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या किमतींनी विक्रमी पातळी गाठत 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. पण, त्यानंतर बुधवारी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. आता गुरुवारी सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ दिसून आली आहे. याचे मुख्य कारण डॉलर निर्देशांकातील घसरण असल्याचे मानले जाते. तज्ज्ञांच्या मते डॉलर निर्देशांकातील घसरणीचा परिणाम येत्या काळात दिसून येऊ शकतो. यामुळे सोन्याच्या किमती नवीन विक्रमी पातळी गाठू शकतात.
दिल्लीत सोने किती महाग झाले आहे?
ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत 200 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सोने 99,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. बुधवारी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याने ऐतिहासिक 1 लाख रुपयांच्या पातळीवरून यु-टर्न घेत 99,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. तर, 99.5 टक्के शुद्धतेचे सोनेदेखील 200 रुपयांनी वाढून 98,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दरम्यान, गुरुवारी चांदीचे दरही 700 रुपयांनी वाढून 99,900 रुपये प्रति किलो झाले.
सोन्याचा भाव का वाढला?
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिका आणि चीनमधील सध्याचा व्यापार गतिरोध काही काळ चालू राहू शकतो. याशिवाय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यात चीनसाठी नवीन टॅरिफ दर लागू होऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू शकतात, असा तज्ञांना अंदाज आहे.