Gold vs Share Market : सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सोने आणि शेअर सर्वाधिक लोकप्रिय मानले जातात. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते तर शेअर्समध्ये जोखीम जास्त आहे. एकीकडे भारतात सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. दुसरीकडे, गेल्या वर्षी सुरू झालेली भारतीय शेअर बाजारातील घसरण अजूनही सुरूच आहे. यामुळेच सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी आहे. तर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. पण, गेल्या १० वर्षात सर्वात जास्त कोणी परतावा दिला माहिती आहे का? या आकड्यांवर तुमचाही विश्वास बसणार नाही.
१० वर्षांपूर्वी सोन्याचा भाव किती होता?१० वर्षांपूर्वी सोन्याची किंमत खूपच कमी होती. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, १९ फेब्रुवारी २०१५ रोजी सोन्याचा भाव २४,१५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर १० फेब्रुवारीला त्याची किंमत ८१,८०३ रुपये प्रति १० ग्रॅम होती. दुसरीकडे, जर आपण शेअर बाजाराबद्दल बोललो तर बीएसई सेन्सेक्स १९ फेब्रुवारीला २९,४६२.२७ अंकांवर बंद झाला. तर १० फेब्रुवारी २०२५ रोजी तो ७७,३११.८ अंकांवर बंद झाला.
१० वर्षात सर्वाधिक परतावा कोणी दिला?गेल्या १० वर्षातील सोने आणि सेन्सेक्सचे आकडे पाहिल्यास अनेक गोष्ट स्पष्ट होतात. सोन्याच्या किमती गेल्या १० वर्षात २३७.५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. म्हणजेच सोन्याने १० वर्षांत गुंतवणूकदारांना २३७.५ टक्के इतका मोठा परतावा दिला आहे. दुसरीकडे, गेल्या १० वर्षांत सेन्सेक्सने १६२.४० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. म्हणजेच गेल्या १० वर्षांत शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना १६२.४० टक्के परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षात शेअर बाजाराच्या तुलनेत सोन्याने जबरदस्त परतावा दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.