gold rate prediction :डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे अमेरिका आणि चीन या दोन महासत्ता देशांमध्ये व्यापारी युद्धाचा भडका उडाला आहे. त्याचवेळी इतर देशांवरील टॅरिफला ट्रम्प यांनी ९० दिवसांची स्थगिती दिली आहे. असे असले तरी या देशांवर टॅरिफचा टांगती तलवार कायम आहे. अशा अनिश्चित वातावरणामुळे शेअर बाजार प्रचंड अस्थिर झाला आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारच नाही तर मोठमोठे देशही आपल्या सोन्याचा भांडार वाढवत आहे. परिणामी सोन्याच्या किमती गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढल्या आहेत. मात्र, आता तुमच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे.
सोन्याचा भाव १.३० लाखांपर्यंत जाणार?
वाढत्या व्यापार युद्धामुळे आणि मंदीच्या भीतीमुळे, यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ४,५०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. आंतरराष्ट्रीय दरांनुसार मोजले तर भारतात १० ग्रॅम सोन्याची किंमत १.३० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. परदेशी गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने हा अंदाज जाहीर केला आहे. पण, जर व्यापार युद्ध आणि मंदीचा धोका वाढला तरच हे घडू शकतं असेही त्यांनी म्हटलं आहे.
गोल्डमन सॅक्सची भाकीत काय?
- पहिला अंदाज : फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंदाजात, गोल्डमनने सोन्याचा भाव प्रति औंस ३,१०० डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता.
- दुसरा अंदाज: मार्च २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंदाजात, गोल्डमनने सोन्याचा भाव प्रति औंस ३,३०० डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता.
- तिसरा अंदाज: एप्रिल २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंदाजात, गोल्डमनने सोन्याचा भाव प्रति औंस $३,७०० पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे.
सोने सध्या विक्रमी उच्चांकावर
सोने सध्या विक्रमी उच्चांकावर आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याचे १० ग्रॅम दर ९३,३५३ रुपयांवर पोहोचले आहे. या वर्षी, १ जानेवारीपासून आतापर्यंत, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७६,१६२ रुपयांवरून १७,१९१ रुपये म्हणजेच २२.५७% वाढली आहे. सध्या सोने९३,३५३ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकली जात आहे.
वाचा - 'या' बिझनेस वुमनने रात्रीत 'अंबानीं'ना टाकलं मागे; देशातील सर्वात श्रीमंत महिला; किती आहे संपत्ती?
सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची ३ कारणे:
- अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे व्यापार युद्धाचा धोका वाढला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावू शकतो. जागतिक मंदीची भीतीही वाढली आहे. अशा परिस्थितीत लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. मंदीच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.
- डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. कारण जेव्हा रुपया कमकुवत होतो तेव्हा तो आयात करण्यासाठी जास्त पैसे लागतात. या वर्षी रुपयाचे मूल्य जवळपास ४% घसरले आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव आला आहे.
- लग्नसराईचा हंगाम जवळ येत आहे, त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे. मुंबई, दिल्ली आणि चेन्नईसारख्या शहरांमधील ज्वेलर्सनी सांगितले की, लोक सोन्याला गुंतवणूक आणि समृद्धीचे प्रतीक मानत असल्याने, उच्च किमती असूनही विक्री तेजीत होती.