Join us  

सरकार पुन्हा देतंय ९९.९% शुद्ध सोन्यात गुंतवणूकीची संधी; कशी कराल गुंतवणूक, काय आहेत फायदे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 12:08 PM

सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तुम्हाला पुन्हा एकदा स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे.

Sovereign Gold Bond: सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तुम्हाला पुन्हा एकदा स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. १२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेअंतर्गत सोन्यात गुंतवणूक करू शकता. सॉवरेन गोल्ड बाँड नेहमी खरेदी करता येत नाहीत, यासाठी वेळोवेळी तारीख निश्चित केली जाते. यापूर्वी २२ डिसेंबर रोजी खरेदी करण्याची संधी होती. आता पुन्हा एकदा सरकार गुंतवणूकदारांना त्यात गुंतवणूक करण्याची संधी देणार आहे. 

काय आहे सॉवरेन गोल्ड बाँड ? 

सॉवरेन गोल्ड बाँड हे सरकारी बाँड आहे. ते आरबीआयनं जारी केलं आहे. सॉवरेन गोल्ड बाँडचे डिमॅटमध्ये रूपांतर करता येते. हा बाँड १ ग्रॅम सोन्याचा आहे, म्हणजेच १ ग्रॅम सोन्याची किंमत ही बाँडची किंमत असेल. सॉवरेन गोल्ड बाँडद्वारे, तुम्ही २४ कॅरेटच्या ९९.९ टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता. ऑनलाइन अर्ज केल्यावर आणि डिजिटल पेमेंट केल्यास, प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट उपलब्ध आहे. कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान १ ग्रॅम आणि जास्तीत जास्त ४ किलो सोन्यात  गुंतवणूक करू शकते. 

कुठून खरेदी करू शकता? 

  • बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता
  • तुम्ही पोस्ट ऑफिसमधूनही ते खरेदी करू शकता.
  • स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारे खरेदी करता येईल.
  • बीएसई आणि एनएसई प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी करण्याचा पर्याय आहे. 

काय आहेत याचे फायदे? 

  • यावर तुम्हाला वार्षिक २.४ टक्के व्याज मिळतं, जे दर सहा महिन्यांनी दिलं जातं.
  • बाजारात सोन्याची किंमत वाढली की तुमच्या गुंतवणुकीचं मूल्यही वाढतं.
  • डिमॅट असल्यानं सुरक्षेची चिंता नाही.
  • जीएसटीच्या कक्षेत येत नाही, भौतिक सोन्यावर ३ टक्के जीएसटी लावला जातो.
  • बाँड्सद्वारे कर्जाचा पर्यायही उपलब्ध आहे.
  • शुद्धतेची कोणतीही अडचण नाही, कारण ते कागदी असल्यानं आपल्याला त्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही.
  • मुदतपूर्तीनंतर तुम्हाला सोन्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
  • ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करण्याची संधी आहे.
टॅग्स :सोनंसरकार