गुजरातच्या साबरकंठा जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश यांनी आपली कोट्यवधी रुपयांची संपत्तीदेखील दान केली. विशेष म्हणजे, भावेश यांचा 16 वर्षीय मुलगा आणि 19 वर्षीय मुलीने दोन वर्षांपूर्वीच दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. 2022 मध्ये मुलगा आणि मुलीने संन्यास घेतल्यानंतर आता भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीनेही हा मार्ग स्वीकारला आहे.
200 कोटींची संपत्ती दान
भावेश भाई भंडारी यांनी अचानक अहमदाबादमधील बिल्डिंग कंस्ट्रक्शन व्यवसाय सोडून दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. संन्यास घेण्यापूर्वी त्यांनी आपली 200 कोटींहून अधिकची संपत्तीदेखील दान केली.
भावेश भाई यांचे मित्र दिलीप गांधी म्हणाले की, जैन समाजात दीक्षेला मोठे महत्त्व आहे. दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीला भिक्षा मागून जीवन जगावे लागते, तसेच सर्व गोष्टींचा त्यागही करावा लागतो. दरम्यान, दीक्षा घेण्यापूर्वी भावेश भाई यांची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सुमारे चार किलोमीटर लांब होती. या मिरवणुकीत जैन समाजातील अनेकजण सहभागी झाले होते.