SBI Green Rupee Term Deposit : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट (SBI Green Rupee Term Deposit) ही नवीन टर्म डिपॉझिट स्कीम सुरू केली आहे. भारतीय नागरिकांसोबत अनिवासी भारतीय देखील एसबीआयच्या या योजनेत पैसे गुंतवू शकतात. १,१११ दिवस, १,७७७ दिवस आणि २,२२२ दिवसांसाठी गुंतवणूकदार ग्रीन रुपी टर्म डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवू शकतात. बँक या योजनेत गुंतवलेल्या पैशाचा वापर पर्यावरण हिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करेल. या प्रकल्पांमध्ये रिन्युएबल एनर्जी, एनर्जी एफिशिअंट, जलसंधारण आणि प्रदूषण नियंत्रण इत्यादींचा समावेश आहे.
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, २०७० पर्यंत भारताला नेट कार्बन झीरो बनवण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. हे पूर्ण करण्यासाठी एसबीआयनं ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट सुरू केले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार वित्तीय भविष्याला चालना देण्यासाठी उचललेलं हे पाऊल आहे. खारा म्हणाले की सध्या ही योजना ब्रान्च नेटवर्कद्वारे उपलब्ध आहे आणि लवकरच ती 'योनो' अॅप आणि ऑनलाइन बँकिंगसारख्या डिजिटल माध्यमांवर देखील उपलब्ध होईल.
कोण करू शकतं गुंतवणूक?
कोणताही भारतीय, नॉन इंडिविज्युअल्स आणि अनिवासी भारतीय एसबीआय ग्रीन रुपी टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकतो. या योजनेचा कालावधी ११११ दिवस, १७७७ दिवस आणि २२२२ दिवसांचा आहे. गुंतवणूकदार यापैकी कोणताही एक कालावधी निवडू शकतो.
किती मिळेल व्याज?
एसबीआय ग्रीन रुपी टर्म डिपॉझिटमध्ये ११११ दिवस आणि १७७७ साठी पैसे गुंतवणाऱ्या सामान्य ग्राहकांना ६.६५ टक्के वार्षिक व्याज दिले जाईल. त्याचबरोबर २२२२ दिवसांसाठी पैसे गुंतवणाऱ्या ग्राहकांना ६.४० टक्के व्याज दिलं जाईल. बँक ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज देईल. जर तुम्ही ११११ दिवस आणि १७७७ दिवसांच्या बल्क डिपॉझिटवर पैसे गुंतवले तर तुम्हाला ६.१५ टक्के वार्षिक व्याज मिळेल आणि जर तुम्ही २२२२ दिवसांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला ५.९० टक्के वार्षिक व्याज मिळेल.
प्री-विड्रॉवल सुविधा उपलब्ध
गुंतवणूकदारांना एसबीआय ग्रीन रुपी टर्म डिपॉझिटमध्ये प्री-मॅच्युअर पैसे काढण्याची सुविधा मिळेल. याचा अर्थ तुम्ही या एफडीमध्ये गुंतवलेले पैसे मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच काढू शकता. एवढेच नाही तर बँक या एफडीवर कर्ज आणि ओव्हरड्राफ्टची सुविधाही देईल. आयकर नियमांनुसार या योजनेवर टीडीएस देखील लागू होईल.