Join us  

सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या SBIच्या गुंतवणूक योजनेची अंतिम मुदत वाढली, मिळणार दुहेरी नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 3:35 PM

SBI Amrit Kalash Extend: स्टेट बँकेनं पुन्हा एकदा या स्कीमची अंतिम मुदत वाढवली आहे. पाहा काय आहे यात खास आणि कधीपर्यंत करता येईल गुंतवणूक.

SBI Amrit Kalash Extend:  देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक गुंतवणूकीच्या निरनिराळ्या स्कीम्स चालवत असते. यापैकीच एक स्कीम म्हणजे अमृत कलश योजना. ही एक फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये ग्राहकांना उत्तम परतावाही दिला जात आहे. दरम्यान, यात गुंतवणूक करण्याच्या विचारात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसबीआय अमृत कलश योजनेतील गुंतवणूकीची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. आता यात गुंतवणूकीसाठी आणखी चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. 

कधीपर्यंत संधीएसबीआय अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत यापूर्वी १५ ऑगस्ट २०२३ होती. परंतु आता बँकेनं ही मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. आता गुंतवणूकीसाठी आणखी ४ महिन्यांचा कालावधी मिळेल. बँकेच्या वेबसाईटनुसार ४०० दिवसांच्या टेन्योरच्या अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळतो.

किती मिळतं व्याजसर्व वयोगटातील लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि बँक मासिक, त्रैमासिक आणि सहामाही आधारावर गुंतवणूकीवर मिळणारं व्याज देते. स्टेट बँक त्यांच्या गुंतवणूकदारांना या डिपॉझिट स्कीममध्ये ४०० दिवसांच्या गुंतवणुकीच्या कालावधीसह अधिक व्याज देते. स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेनं विशेष एफडी स्कीम अमृत कलशवर सामान्य नागरिकांना ७.१० टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतलाय. तर, बँकेनं ४०० दिवसांच्या कालावधीसह या एफडी स्कीमवर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर देण्यात येत आहे.

यापूर्वीही जूनमध्ये गुंतवणुकीची मुदत वाढवण्यात आली होती. सामान्य नागरिकांसोबत ज्येष्ठ नागरिक देखील एसबीआयच्या या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. परंतु दोन्ही कॅटेगरीमध्ये व्याजदर मात्र निरनिराळे निश्चित करण्यात आलेत. यामध्ये गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर व्याज दिलं जातं. टीडीएस कापून व्याजाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते. याशिवाय मुदतीपूर्वी जर रक्कम काढली तर डिपॉझिटच्या वेळी असलेल्या व्याजदरापासून ०.५० ते १ टक्के पेनल्टी आकारली जाते.

टॅग्स :एसबीआयगुंतवणूकपैसा