Hindenburg New Target: काही महिन्यांपूर्वी अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या अदानी समूहाविरोधात रिपोर्ट सादर केली होती. त्या रिपोर्टमुळे अदानी समूहाचे शेअर्स निम्म्याहून खाली घसरले. यामुळे अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागले. यानंतर आता हिंडेनबर्गने आपला पुढील टार्गेट शोधला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने मंगळवारी टिंगो ग्रुपमधील कथित फसवणुकीचा खुलासा केला आहे. या खुलाशानंतर गेल्या 20 तासांत टिंगो ग्रुपच्या शेअर्समध्ये अदानी समूहापेक्षा जास्त घसणर झाली आहे.
हिंडेनबर्गने टिंगो ग्रुपचे संस्थापक डोजी मोम्बोसी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हिंडेनबर्गने टिंगो ग्रुपच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर टिंगो ग्रुपचे शेअर्स 80 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. Tingo ही Agri Fintech कंपनी आहे. कंपनीचे संस्थापक डोजी मोम्बोसी आहेत. मोम्बोसी या वर्षाच्या सुरुवातीला चर्चेत आले होते. त्यांनी शेफिल्ड युनायटेड फुटबॉल संघ विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. टिंगो ग्रुप आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य पूर्वमध्ये कार्यरत आहे. मोम्बोसीवर हिंडेनबर्गने अनेक गंभीर आरोप केले आहेत.
हिंडेनबर्गने संस्थापकाने घेरले
टिंगो ग्रुप प्रामुख्याने नायजेरियातील शेती आणि अन्न प्रक्रिया व्यवसायावर केंद्रित मोबाइल तंत्रज्ञान आणि पेमेंट व्यवसाय चालवते. हिंडनबर्गच्या मते, नायजेरियातील पहिले मोबाइल पेमेंट अॅप तयार करण्याचा डोजी मोम्बोसीचा दावा हा खोटा आहे. हिंडेनबर्गने दावा केला की, त्यांनी या अॅपच्या निर्मात्याशी संपर्क साधला आहे आणि डोजी मोम्बोसीचे दावे फेटाळले आहेत. अशा प्रकारे टिंगोने गुंतवणूकदारांशी खोटं बोलून त्यांची दिशाभूल केली आहे.
हिंडेनबर्गने आपल्या अहवालात सांगितले की, टिंगोने दावा केल्यानुसार, त्यांच्या मोबाइल हँडसेट लीजिंग, कॉल आणि डेटा व्यवसायातून गेल्या वर्षी $128 मिलियन कमाई झाली. नायजेरियातील एअरटेलसोबत झालेल्या कराराद्वारे या सेवा दिल्या जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पण हिंडेनबर्गने आपल्या दाव्यात सांगितले आहे की, एअरटेल आफ्रिकेने एअरटेल नायजेरियाचा टिंगो मोबाइलशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. टिंगोने फाइलिंगमध्ये म्हटले की, एअरटेलसोबत झालेल्या करारानुसार त्यांचा मोबाइल व्यवसाय चालवला जात आहे.