Join us  

How to Become Rich: लाखोंत लावून कोटींत कमवतात! श्रीमंतांच्या इन्कमचा पत्ता लागला; नाइट फ्रैंकचा सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 4:59 PM

श्रीमंतांच्या आर्थिक परिस्थितीचे कोरोनाच नाही तर नोटबंदीदेखील काही वाकडे करू शकली नाही. मग हे लोक असे काय करतात की त्यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते.

देशातील अनेक अब्जाधीश, करोडपतींची संपत्ती दरवर्षी वाढत जाते. आपण म्हणतो पैशाकडे पैसा जातो, पण तसे नसते. सध्या कोरोना महामारीच्या संकटानंतर लोक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. अनेकांचे धंदे सुरु तर झालेत परंतू पूर्वीसारखे नाही राहिले. महागाईने कंबरडे मोडले अशी अवस्था आहे. मग हे श्रीमंत आणखी श्रीमंत कसे काय होतात? 

श्रीमंतांच्या आर्थिक परिस्थितीचे कोरोनाच नाही तर नोटबंदीदेखील काही वाकडे करू शकली नाही. मग हे लोक असे काय करतात की त्यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. नुकत्याच हाती आलेल्या सर्व्हेनुसार देशातील सुपर रिच लोक आपल्या संपत्तीचा ८४ टक्के वाटा हा इक्विटी, रिअल इस्टेट आणि बॉन्ड मार्केटमध्ये गुंतवितात. 

नाइट फ्रँकच्या अॅटिट्यूड सर्व्हेनुसार, हे श्रीमंत लोक 34 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात, तर त्यांच्या पोर्टफोलिओपैकी 25 टक्के गुंतवणूक थेट किंवा फंड आणि आरईआयटीद्वारे व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये केली जाते.देशातील श्रीमंत लोकांनी 2022 मध्ये त्यांच्या गुंतवणूक करण्यायोग्य मालमत्तेपैकी 34 टक्के रक्कम इक्विटी मार्केटमध्ये गुंतवली. जागतिक आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातील श्रीमंत व्यक्ती रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. वेगवेगळ्या माध्यमांतून व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये पैसा टाकण्याचे त्यांचे प्रमाण 33 आणि 35 टक्के आहे. 

याचबरोबर अनिश्चित वातावरणात स्थिर परताव्यासाठी, हे लोक त्यांच्या गुंतवणूक करण्यायोग्य निधीपैकी 16 टक्के रक्कम बाँड मार्केटमध्ये गुंतवतात. भारतीय अतिश्रीमंतांकडे सरासरी 5.1 निवासी मालमत्ता आहेत. तर जागतिक सरासरी 4.2 एवढा आहे. श्रीमंतांच्या एकूण भांडवली गुंतवणुकीपैकी सुमारे 37 टक्के गुंतवणूक ही मालमत्तेमध्ये आहे. त्यापैकी 15 टक्के भारताबाहेरील निवासी मालमत्तेत पैसा गुंतलेला आहे. 

14 टक्के अति श्रीमंत लोकांनी 2022 मध्ये नवीन घर विकत घेतले आहे. तर 10 टक्के लोक 2023 मध्ये नवीन घर खरेदी करण्याची शक्यता आहे. युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेमध्ये घर खरेदी करणे हे या श्रीमंत लोकांसाठी पसंतीचे ठिकाण आहे.

टॅग्स :गुंतवणूकपैसा