Join us

Demat Account वापरत नसाल तर आजच करा बंद; नाहीतर बसेल आर्थिक भुर्दंड; अशी आहे प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 3:08 PM

How to close a Demat account : तुमचे डिमॅट खाते खूप दिवसांपासून बंद असेल किंवा तुम्ही सर्व व्यवहार थांबवले असतील तर ते बंद करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला आर्थिक भुर्दंड लागू शकतो.

How to close a Demat account : शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. तर, कधीकधी बँक कर्मचारी कमिशनच्या नादात ग्राहकांना डिमॅट खाते उघडण्यास भाग पाडतात. अशात जर डिमॅट खाते उघडल्यानंतर त्याचा वापर केला नाही तर असे खाते निष्क्रिय होते. खातेधारकाला सतत देखभाल फी द्यावी लागते. देखभाल फीसारखे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी, डिमॅट खाते बंद करणे हा एक चांगला पर्याय आहे.

शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे. डिमॅट खात्याशिवाय गुंतवणूक करता येत नाही. पण, तुम्ही तुमचे डिमॅट खाते दीर्घकाळ वापरत नसल्यास खाते बंद केले जाऊ शकते. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या नियमांनुसार, जर 12 महिने म्हणजे 1 वर्षांपर्यंत ट्रेडिंग खात्यातून कोणत्याही प्रकारचा व्यापार होत नसेल, तर खाते निष्क्रिय होते. अशी खाती निष्क्रिय झाली तरी त्यावर देखभाल खर्च चालूच असते. तुम्ही डिमॅट खाते ऑनलाइन देखील बंद करू शकता.

डिमॅट खाते कसे बंद करावे?

  • सर्व होल्डिंग काढून टाका : तुमच्या डिमॅट खात्यात कोणतेही सिक्योरिटी किंवा निधी शिल्लक नाहीत याची खात्री करा. तुम्हाला तुमचे सर्व सिक्युरिटीज विकावे लागतील किंवा ते बंद करण्यापूर्वी दुसऱ्या डिमॅट खात्यात ट्रान्सफर करावे लागतील.
  • तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी (DP) संपर्क साधा : तुमचे डिमॅट खाते असलेल्या डीपीशी संपर्क साधा. डीपी ही बँक, वित्तीय संस्था किंवा ब्रोकरेज फर्म असू शकते. तुम्हाला त्यांचे संपर्क तपशील तुमच्या अकाउंट स्टेटमेंटवर किंवा त्यांच्या वेबसाइटवर मिळून जातील.
  • क्लोजर फॉर्म भरा : तुमच्या डीपीकडून क्लोजर फॉर्मची मागणी करा. सर्व आवश्यक तपशीलांसह फॉर्म योग्यरित्या भरा. यामध्ये तुमचा डीमॅट खाते क्रमांक, वैयक्तिक तपशील आणि बंद होण्याची कारणे आदी स्पष्ट करा.
  • आवश्यक कागदपत्रे जमा करा : क्लोजर फॉर्मसह, तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची प्रत, पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा यासारखी काही कागदपत्रे सादर करावी लागतील. तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे तयार असल्याची खात्री करा.
  • थकीत रकमेची पुर्तता करा : तुमच्या डिमॅट खात्याशी संबंधित काही देय किंवा शुल्क असल्यास, बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी असे व्यवहार पूर्ण करा. यामध्ये वार्षिक देखभाल शुल्क किंवा व्यवहार शुल्क समाविष्ट असू शकते.
  • व्हेरीफिकेशन आणि प्रोसेसिंग : डीपी क्लोजर फॉर्म आणि तुम्ही सबमिट केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करेल. सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर, ते बंद करण्याची प्रक्रिया सुरू करतील.
  • तुमचे खाते बंद झाल्याची माहिती तुम्हाला मॅसेज आणि इमेलच्या माध्यमातून समजेल. जर तसे झाले नाही तर डीपी यांच्याशी संपर्क साधावा लागेल.
टॅग्स :गुंतवणूकबँक