Personal Finance : सध्याच्या महागाईच्या काळात पगार कधी खर्च होतो, हेच समजत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांचे उत्पन्न कितीही असले तरी त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. वाढत्या पगारासोबत त्यांचे खर्चही वाढत जातात. जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण बचत न करण्याची ही सवय तुमच्या भविष्यासाठी अडचणीची ठरू शकते. जर घरात तुम्ही कमावते असाल तर सर्व जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर असतात. अशावेळी बचत आणि गुंतवणूकीचे महत्त्व तुमच्यासाठी आणखी वाढते. तुमच्या अनियंत्रित खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पण, तुम्ही तर सोप्या टीप्स फॉलो केल्या तर तुम्ही तुमचा संपूर्ण पगार खर्च केला तरी तुम्हाला कोणताही पश्चाताप होणार नाही.
बचत करण्यासाठी ही पद्धत वापरा
आर्थिक नियम सांगतो की, तुम्ही तुमच्या पगारातील २० टक्के बचत केली पाहिजे. जर तुम्ही पैसे वाचवू शकत नसाल तर तुमचा पगार येताच २० टक्के रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करा. यानंतर तुमच्या खात्यात जे काही पैसे शिल्लक राहतील ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार खर्च करा. जर तुमच्याकडे दुसरे खाते नसेल, तर अशावेळी पगार झाल्यानंतर लगेच ही रक्कम गुंतवा. समजा तुम्हाला ५०,००० रुपये पगार असेल, तर ५०,००० रुपयांच्या २० टक्के म्हणजे १०,००० रुपये तुम्ही गुंतवले पाहिजेत. म्हणजे दर महिन्याला तुमची १० हजार रुपयांची निश्चित बचत होईल.
गुंतवणुकीसाठी पहिला आठवडा महत्त्वाचा
पगार झाल्यानंतर पहिल्याच आठव्यात गुंतवणूक करणे योग्य असते. कारण, तुम्हाला वाटत असेल की महिन्याच्या अखेरीस गुंतवणूक करू. तर तोपर्यंत काही खर्च निघाला तर गुंतवणुकीचे पैसे खर्च होऊन जातील. त्यामुळे तुमचा पगार मिळताच तुम्ही गुंतवणूक केल्यास, तुमच्याकडे जे काही पैसे शिल्लक असतील त्यातून तुमचा खर्च भागवावा लागेल. याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की २० टक्के रक्कम गुंतवल्यानंतर, तुमचा खर्च भागवण्यासाठी तुमच्याकडे असलेली रक्कम कमी आहे, तर तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चात कपात करणे आवश्यक आहे. मात्र गुंतवणुकीच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. सुरुवातीला तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, पण हळूहळू ती तुमच्या अंगवळणी पडेल.
गुंतवणूक कुठे करावी?
बचत करण्याचं ठरल्यानंतर पहिला प्रश्न मनात येतो की गुंतवणूक कुठे करावी? आजकाल आरडी, पीपीएफ, एसआयपी, म्युच्युअल फंड अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवू शकता. यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करुन मोठा फंड उभा करू शकता. जर तुमची २० टक्के रक्कम मोठी असेल, तर तुम्ही ती विभागून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवू शकता. उदाहरणार्थ, रु. १०,००० पैकी तुम्ही एसआयपीमध्ये ४,००० रुपये गुंतवू शकता, ४,००० रुपये PPF मध्ये दीर्घ मुदतीसाठी आणि रु २,००० मध्ये तुम्ही अल्पकालीन एसआयपी सुरू करू शकता किंवा RD चालवू शकता. याशिवाय, जर तुम्ही EPFO मध्ये योगदान देत असाल तर तुम्ही VPF द्वारे EPF मध्ये तुमचे योगदान देखील वाढवू शकता. तुम्हाला EPF मध्ये देखील खूप चांगले व्याज मिळते. शिवाय भविष्यासाठी चांगली रक्कम जमा होईल.
या खर्चावर नियंत्रण ठेवून बचत होईल
- तुम्हाला सिगारेट, दारू वगैरे व्यसन असेल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा.
- महिन्यातून दोनदा बाहेर जेवायला जात असाल तर एकदा जा.
- क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने कमी करा.
- जर तुम्ही मित्रांसोबत पार्ट्यांमध्ये पैसे खर्च करत असाल तर या सवयीवर नियंत्रण ठेवा.
- जर तुम्ही ऑफर्समुळे अनावश्यक खरेदी करत असाल तर या सवयीवर नियंत्रण ठेवा.