‘दरमहा ठरावीक रक्कम’ स्वीकारून त्यावर ठरावीक दराने व्याज देऊन त्या रकमेतून ग्राहकाला काही ज्वेलर्सकडून सोने किंवा दागिना बनवून घेता येतो. त्यावर ३% जीएसटी लावला जाऊन पक्के बिल देखील मिळते. परंतु पुढे कधीतरी तेच सोने त्याच पेढीकडे जमा करून त्यातून दागिना बनविण्यास दिल्यास पुन्हा पूर्ण सोन्याच्या वजनावर अधिक घडणावळीवर जीएसटी लावला जातो. एकदा जीएसटी भरलेला होता तर फक्त वजनातील तफावतीवर व घडणावळीवरच जीएसटी लावणे आवश्यक आहे ना?.. - एक वाचक
ग्राहकाने दोन वेळा जीएसटी का भरावा ?या एकूण प्रकारात दोन स्वतंत्र व्यवहार गुंतलेले आहेत. दरमहा काही पैसे भरले व योजनेची मुदत संपल्यावर त्या बदल्यात सोने किंवा दागिना घेतला तर आपला एक व्यवहार पूर्ण होत असतो, त्यावर राज्य आणि केंद्र शासनाचा जीएसटी द्यावा लागतो. त्यावेळी जीएसटी द्यायला आपली काही हरकत नाही, असे तुमच्या प्रश्नावरून वाटते आहे. पण आपण तो व्यवहार पूर्ण झाल्यानंतर काही काळाने दुसरा व्यवहार करण्याचे उदाहरण देत आहात. त्यात पूर्वी घेतलेले सोने देऊन त्या बदल्यात तितक्या वजनाचे किंवा त्यात काही भर घालून नव्याने दागिना घडवून घेत आहात. हा व्यवहार पहिल्यापेक्षा वेगळा व स्वतंत्र आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळा व स्वतंत्र जीएसटी आकारला जाईल. त्यात चुकीचे किंवा अयोग्य नाही. पहिल्यांदाच घेतलेल्या सोन्याचा, त्यात भर घालून देखील नवा दागिना करून घेतला तर त्यावर घडणावळीसह जीएसटी आकारला जाईल. म्हणजे अशा व्यवहारात एकदाच जीएसटीची आकारणी होईल.
आपण सांगत आहात त्यातले दोन स्वतंत्र व्यवहार आपण समजावून घेतलेत तर दोन वेळा आकारणी होत असलेल्या जीएसटीचे कोडे सहज लक्षात येईल. ग्राहक जितक्या वेळा व्यवहार करेल, तितक्या वेळा जीएसटीची आकारणी होईल. आपल्याला मिळत असलेल्या पावतीवर आपल्याकडून व्यावसायिकाने घेतलेल्या जीएसटीची नोंद केलेली असते. त्यात त्याचा जीएसटी नंबर दिलेला असतो. आपण भरलेला जीएसटी व्यापाऱ्याने सरकारकडे भरलेला आहे की नाही, याची जीएसटीच्या पोर्टलवर जाऊन आपण सहज खात्री करून घेऊ शकता.
- ग्राहक प्रबोधन आणि संशोधन संस्था, नाशिक तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com