Join us  

शेअर बाजार नाही तर, बँकेचे रिटर्न्स आवडतात? 'हा' पर्यायही पाहू शकता, ठरू शकतं फायद्याचं  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 1:13 PM

पाहा गुंतवणूकीसाठी कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट.

MF vs FD: शेअर बाजारात सध्या तेजी पाहायला मिळत आहे. काल म्हणजेच बुधवारी मुंबई शेअर बाजाराच्या (BSE) सेन्सेक्सनं विक्रमी उच्चांक गाठला. अशा परिस्थितीत बँक एफडी किंवा पारंपरिक पद्धतीनं गुंतवणूक करून कमावणाऱ्या गुंतवणूकदारांनाही ते आकर्षित करत आहे. पारंपारिक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूकीसाठी अनेक ऑफर्सही असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. उपलब्ध पर्यायांपैकी एक म्हणजे इक्विटी सेव्हिंग्ज फंड जो अशा गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

काय आहे इक्विटी सेव्हिंग फंड?इक्विटी सेव्हिंग्ज फंड ही ओपन-एंडेड म्युच्युअल फंड स्कीम आहे. ही उत्पन्न निर्माण करण्यासाठी संपत्ती तयार करण्यादरम्यानची बचत सुविधा प्रदान करते. ज्यांना उत्तम पर्याय हवा आहे आणि किमान तीन वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड स्कीम्सच्या वर्गीकरणांतर्गत, बाजार नियामक सेबीनं २०१७ मध्ये इक्विटी बचत निधीच्या श्रेणीतील इक्विटी, डेट आणि आर्बिट्राजमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. हेच वैशिष्ट्य त्यांना हायब्रिड फंडांपासून वेगळे करत असल्याची प्रतिक्रिया इम्पीरियल व्हॅल्यू सर्व्हिसेसचे सीईओ सतीश पांडे यांनी दिली.

किती गुंतवणूक कराल?इक्विटी सेव्हिंग्ज फंडाच्या नियमानुसार इक्विटी आणि त्याच्याशी निगडीत संसाधनांमध्ये किमान ६५ टक्के गुंतवणूक करावी. डेट प्रोडक्टमध्येही १० टक्क्यांपेक्ष कमी अलोकेशन नसावं. फंडाचं स्वरूप पाहता, नियमित इक्विटी फंड किंवा हायब्रीड फंड श्रेणींच्या तुलनेत इक्विटी बचत श्रेणीची ऑफर जोखीम रोखण्यासाठी उत्तम आहे. दुसरीकडे, असे फंड नियमित डेट फंड किंवा पारंपारिक आर्थिक गुंतवणुकीच्या मार्गांच्या तुलनेत केवळ जास्त परतावाच देत नाहीत तर ते कर कार्यक्षमतेच्या बाबतीतही चांगली कामगिरी करतात. 

उत्तम रिटर्नगुंतवणूकदारांना त्यांच्या अल्पकालीन गुंतवणुकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण, स्थिर आणि जोखीम-समायोजित रिटर्न देणं हे फंडाचं उद्दिष्ट आहे. पोर्टफोलिओचा इक्विटी भाग भांडवलात वाढ करतो, तर डेट आणि आर्बिट्राज भाग स्थिर परतावा देतात. हे पोर्टफोलिओ स्थिर ठेवण्यास मदत करते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :गुंतवणूक