Join us  

अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला आणि बँकेत नॉमिनीच नाहीये तर, कोणाला मिळणार पैसे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 10:09 AM

बँक खातं, डिमॅट खातं किंवा इतर कोणत्याही आर्थिक खात्यांसाठी नॉमिनी ठेवणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या ही लक्षात आलं असेल की, जेव्हा तुम्ही बँकेत खातं उघडण्यासाठी जाता तेव्हा बँक कर्मचाऱ्यानं तुम्हाला नॉमिनी ठेवण्यास सांगितलं असेल.

बँक खातं, डिमॅट खातं किंवा इतर कोणत्याही आर्थिक खात्यांसाठी नॉमिनी ठेवणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या ही लक्षात आलं असेल की, जेव्हा तुम्ही बँकेत खातं उघडण्यासाठी जाता तेव्हा बँक कर्मचाऱ्यानं तुम्हाला नॉमिनी ठेवण्यास सांगितलं असेल. नॉमिनीचं नाव, खातेदाराशी असलेले नातेसंबंध, वय, पत्ता आदी माहिती बँक खात्यात घेतली जाते. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की, बँक खात्यांसाठी नॉमिनी बनवणं इतकं महत्त्वाचं का आहे, त्यानंतर आपल्याला हेही कळेल की जर एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यासाठी नॉमिनी ठेवला नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यात जमा झालेले पैसे कोणाला दिले जातील

मृत्यूनंतर नॉमिनीला पैसे मिळतात

एखाद्या खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यात जमा झालेले सर्व पैसे त्यानं केलेल्या नॉमिनीला दिले जातात. जर एखाद्या व्यक्तीनं एकापेक्षा जास्त नॉमिनी केल्या असतील तर त्या सर्व नॉमिनींना समान पैसे दिले जातात. अनेक बँका अशी सुविधाही देत आहेत, ज्यात तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी करू शकता आणि तुमच्या मृत्यूनंतर कोणत्या व्यक्तीला किती हिस्सा द्यायचा आहे याचाही उल्लेख करू शकता.

नॉमिनीचं महत्त्व काय?

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीनं आपल्या बँक खात्यासाठी पत्नी, आई आणि बहिणीला नॉमिनी केलंय असं समजू. कोणत्याही कारणानं त्या खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या बँक खात्यात जमा झालेले सर्व पैसे त्याची पत्नी, आई आणि बहीण यांच्यात समप्रमाणात वाटले जातील. तर दुसरीकडे एखाद्यानं आपल्या बँक खात्यासाठी ३ जणांना नॉमिनी केलं आहे. परंतु त्यानं नॉमिनी बनवताना त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यात जमा झालेल्या पैशांपैकी ५० टक्के रक्कम पत्नीला आणि २५-२५ टक्के रक्कम आई आणि बहिणीला देण्यात यावी, असं नमूद केलं. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यात जमा झालेल्या सर्व पैशांपैकी ५० टक्के रक्कम त्याच्या पत्नीला दिली जाईल, तर २५-२५ टक्के रक्कम त्याची आई आणि बहिणीला दिली जाईल.

नॉमिनी नसेल तर काय?

जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या बँक खात्यासाठी कोणालाही नॉमिनी बनवलं नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यात जमा झालेले सर्व पैसे त्याच्या कायदेशीर वारसदाराला दिले जातील. विवाहित पुरुषाला कायदेशीर वारसदार म्हणून त्याची पत्नी, मुले आणि आई-वडील असतात. मृत खातेदार अविवाहित असेल तर त्याचे आई-वडील, भावंडे त्याचा कायदेशीर वारसदार म्हणून दावा करू शकतात. समजा नॉमिनी नसेल तर त्यासाठी अनेक कागदपत्रांची गरज भासते.

कसे मिळतील पैसे?जर एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाला असेल आणि त्यानं आपल्या बँक खात्यासाठी नॉमिनी केलं नसेल तर त्याच्या कायदेशीर वारसदाराला त्याच्या खात्यात जमा केलेले सर्व पैसे दिले जातील. त्यासाठी कायदेशीर वारसदाराला काही आवश्यक कागदपत्रे घेऊन बँकेच्या शाखेत जावं लागेल. कागदपत्रांसाठी मृत खातेदाराचा मृत्यूचा दाखला, कायदेशीर वारसदाराचा फोटो, केवायसी, डिस्क्लेमर एनेक्सचर-ए, लेटर ऑफ इडेम्निटी एनेक्सचर-सी ची गरज भासते.

टॅग्स :बँकपैसा