Investment Tips : कोट्यधीश असणं हे रॉकेट सायन्स नाही. यासाठी तुम्हाला फक्त बचत आणि गुंतवणुकीची रणनीती समजून घ्यावी लागेल आणि स्वत:मध्ये थोडा संयम बाळगावा लागेल. कारण अशा कोणत्याही कामासाठी लागणारा कालावधी हा अधिक असतो. आता गुंतवणूक कुठे करायची हा प्रश्न येतो. जर तुम्ही थोडी रिस्क घेऊ शकत असाल तर म्युच्युअल फंड एसआयपीसारख्या योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. पण जर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर तुम्ही पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचा पर्याय निवडू शकता. पीपीएफमध्ये तुम्ही वर्षाकाठी दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सध्या या योजनेवर ७.१ टक्के व्याज दिलं जात आहे. जाणून घेऊ या योजनेच्या माध्यमातून तुम्ही 2 कोटींहून अधिक निधी कसा जमवू शकता.
असे जमतील २,२६,९७,८५७ रुपये
पीएफ स्कीम १५ वर्षांत मॅच्युअर होते. परंतु तुम्ही ती ५ वर्षांसाठी वाढवू शकता. तुम्ही ५-५ वर्षांसाठी त्याला एक्सटेंड करू शकता. जर तुम्हाला २,२६,९७,८५७ रुपयांचा निधी जमवायचा असेल तर तुम्हाला वर्षाला पीपीएफमध्ये १.५ लाख रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच तुम्हाला १२,५०० रुपये जमा करावे लागतील. यानंतर तुम्हाला ती स्कीम ५-५ वर्षांसाठी ४ वेळा वाढवावी लागेल. तुमच्या पीपीएफ अकाऊंटचं ड्युरेशन ३५ वर्षांचं असेल.
असं केल्यास ३५ वर्षांत तुम्ही एकूण ५२,५०,००० रुपयांची गुंतवणूक कराल, पण तुम्हाला यावर १,७४,४७,८५७ रुपये व्याज म्हणून मिळतील. यामध्ये मॅच्युरिटीवर तुम्हाला २,२६,९७,८५७ रुपये मिळतील. जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी ही गुंतवणूक सुरू केली आणि ३५ वर्षे चालू ठेवली तर वयाच्या ६० व्या वर्षी तुमच्याकडे २,२६,९७,८५७ रुपये रिटायरमेंट फंड म्हणून असतील.