Fixed Deposit : शेअर बाजारातील चढउताराच धोका पत्करायचा नाही त्यांच्यासाठी मुदत ठेव अर्थात एफडी योजना सर्वोत्तम आहे. तुम्हाला ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी यात गुंतवणूक करता येते. वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर व्याज देखील वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध आहे. पण जर तुम्हाला FD वर जास्त व्याजाचा फायदा घ्यायचा असेल तर तुमची स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. यामुळे तुमची एफडी 'रिटर्न मशीन' बनेल आणि दरवर्षी तुम्हाला त्यावर व्याजाचा लाभ मिळेल.
तुम्हाला एफडीमधून चांगला परतावा हवा असेल तर एकाच वेळी अनेक एफडी करा आणि तेही वेगवेगळ्या कालावधीनुसार. उदाहरणार्थ, तुमच्याकडे ५ लाख रुपये आहेत. अशा परिस्थितीत ५ लाख रुपयांची एकच FD करण्याऐवजी प्रत्येकी १ लाख रुपयांची ५ FD करा आणि ती १, २, ३, ४ आणि ५ वर्षांसाठी निश्चित करा. असे केल्यास तुमची पहिली एफडी १ वर्षात परिपक्व होईल. तुमची दुसरी एफडी दुसऱ्या वर्षी परिपक्व होईल. अशा प्रकारे तुम्हाला दरवर्षी FD द्वारे चांगला परतावा मिळत राहील.
जेव्हा FD परिपक्व किंवा मॅच्युअर होईल तेव्हा तुम्हाला प्रत्येक FD ची रक्कम पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा निश्चित व्याजासाठी गुंतवायची आहे. पहिली एफडी मॅच्युअर झाल्यानंतर, ती पुन्हा पुढील ५ वर्षांसाठी निश्चित केली, तर ती सहाव्या वर्षी परिपक्व होईल. दुसऱ्या वर्षी मॅच्युअर होणारी एफडी ५ वर्षांसाठी निश्चित केली असेल, तर ती सातव्या वर्षी मॅच्युअर होईल. अशा प्रकारे, तुमच्या FD च्या मॅच्युरिटीचा क्रम १० वर्षे दरवर्षी चालू राहील. या युक्तीला एफडी लॅडरिंग तंत्र (FD Laddering Technique) म्हणतात.
निवृत्त लोकांसाठी सुरक्षित गुंतवणूक पर्यायएफडी लॅडरिंग तंत्राचा फायदा म्हणजे तुम्हाला एफडीवर दरवर्षी व्याजाचा लाभ मिळतो. शिवाय तरलताही राखली जाते. तुम्हाला गरज असल्यास मॅच्युरिटी रकमेतून व्याजाची रक्कम वापरू शकता आणि पुन्हा FD करू शकता. जर तुम्हाला FD मधून चांगले पैसे कमवायचे असतील, तर मॅच्युरिटीनंतर पुढील ५ वर्षांसाठी व्याजासह संपूर्ण रक्कम गुंतवत रहा. तुम्ही हा क्रम कितीही काळ सुरू ठेवू शकता. यातून तुमच्याकडे चांगला निधी जमा होईल. FD लॅडरिंग टेक्निक निवृत्त लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. एफडी मॅच्युअर झाल्यानंतर, ते त्याची व्याजाची रक्कम वापरू शकतात आणि उरलेले पैसे पुन्हा गुंतवू शकतात. अशा प्रकारे गरजा भागवून राहिलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते आणि त्यांना त्यावर व्याज मिळत राहते.
आपात्कालीन परिस्थितीत उपयोगीजर तुम्ही ५ लाख रुपयांची एकच FD केली आणि तुम्हाला १ किंवा २ लाख रुपयांची गरज लागली तर एफडी मोडावी लागेल. यात तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. शिवाय बँकेकडून यावर दंडही आकारला जातो. पण जर तुम्ही लॅडरिंग टेक्निक वापरून गुंतवणूक केली तर तुम्हाला १ किंवा २ लाख रुपयांची गरज पूर्ण करण्यासाठी १ किंवा २ एफडी तोडावी लागतील. उर्वरित 3 एफडींना हात लावावा लागणार नाही. जो दंड आकारला जाईल तो फक्त एक किंवा दोन एफडीवर भरावा लागेल आणि हा दंड ५ लाख रुपयांच्या एफडीच्या तुलनेत कमी असेल.