PF Interest rate: भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑगस्टच्या अखेरीस पीएफ खात्यात व्याज जमा होण्यास सुरुवात होईल. ईपीएफओ (EPFO) आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के व्याज जमा करत आहे. पण, खात्यात सर्वकाही ठीक आहे का? व्याजाची रक्कम तुमच्या खात्यात त्वरित जमा होईल का? हे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर ३१ ऑगस्ट किती महत्त्वाचा आहे ते समजून घेतलं पाहिजे. कर्मचारी वर्गासाठी व्याजाचे पैसे खूप महत्त्वाचे असतात. दरम्यान, पीएफ खात्यातील तपशील जुळत नसल्यास तुम्हाला येणाऱ्या व्याजाच्या रकमेपासून वंचित राहावे लागू शकते.
आधार अपटेड आवश्यक
ईपीएफओच्या अपडेटनुसार, ऑगस्टच्या अखेरीस खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. जर तुमच्या खात्यातही व्याज जमा करायचे असेल, तर खाते आधारशी लिंक आहे की नाही ते तपासा. जर UAN खात्याचे सीडिंग आधारसोबत केले नाही तर पैसे पीएफ खात्यात ट्रान्सफर होणार नाहीत. सरकारनं ईपीएफ खात्यात आधार पडताळणी आणि सीडिंग अनिवार्य केले आहे. दरवर्षी व्याजाची रक्कम जमा करण्यापूर्वी खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासले पाहिजे. जर तुमच्या रेकॉर्डमध्ये काही बदल झाले असतील तर ते ईपीएफ खात्यातही अपडेट करणे आवश्यक आहे.
बदल झाल्यास अपडेट करा
ईपीएफओ २२ कोटींहून अधिक खाती सांभाळते. त्यापैकी ६ कोटींहून अधिक खाती केवळ ईपीएफची आहेत. ईपीएफओ सदस्यांनी पीएफ मध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याजासाठी त्यांचा युएएन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. मात्र, ज्यांची खाती आधीच लिंक आहेत त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु, ज्यांची नवीन खाती उघडली गेली आहेत किंवा खात्याच्या तपशीलात काही बदल झाला आहे, त्यांनी आधार अपडेट करणे आवश्यक आहे.
कसं कराल लिंक
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) मदतीनं ईपीएप सदस्य त्यांचे आधार युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी (UAN) ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही लिंक करू शकतात. तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवर ऑनलाइन किंवा थेट कार्यालयात जाऊन आधारला युएएनशी लिंक करू शकता. याबाबत तुम्ही तुमच्या कंपनीचीही मदत घेऊ शकता.
EPFO पोर्टलची मदत
- सर्वप्रथम ईपीएफओच्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
- UAN मध्ये लॉग इन करा आणि अकाऊंटमध्ये जा
- 'मॅनेज मेन्यू'अंतर्गत KYC वर क्लिक करा.
- आधारचा पर्याय निवडा आणि तुमचा आधार तपशील एन्टर करा.
- यानंतर Save वर क्लिक करा.
- UIDAI डेटा वापरून आधारची पडताळणी केली जाईल.
- KYC पूर्ण झाल्यावर ईपीएफ खात्याशी आधार लिंक केलं जाईल.
लिंक झालंय का नाही कसं पाहाल
- https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या पोर्टलला भेट द्या.
- लॉगिन करण्यासाठी UAN आणि पासवर्ड टाका.
- लॉग इन केल्यानंतर, 'मॅनेज' टॅबवर जा आणि 'केवायसी' वर क्लिक करा. जर तुमचा आधार क्रमांक दिसत असेल आणि व्हेरिफाईड असेल तर युएएन आधारशी लिंक आहे असं समजा.
- जर तुमचा आधार क्रमांक व्हेरिफाईड डॉक्युमेंट टॅबमध्ये नसेल तर युएएनला आधारशी लिंक करावं लागेल.